Monday, February 28, 2022

आवाज कोणाचा?

टीव्ही चा आवाज बारीक करता का जरा? हा प्रश्न मी लहानपणीआमच्या मजल्यावरच्या कित्येकांना कित्येकदा विचारला असेल त्याचा सुमार नाही. राजमाह बिल्डिंग  मजल्यावरच्या बारा घरांपैकी कित्येक घरांमध्ये त्यांचा टीव्हीचा आवाज मनाला येईल तितक्या उच्च प्रतीचा ठेवला जात असे. मग त्यात चढाओढ. भला इसका आवाज मेरे आवाज से ज्यादा कैसा?    

तरी एक बरं तेंव्हा चॅनेल्स दोनच होती. एक डीडी १ आणि २. पण तरीही हर तऱ्हेचे आवाज आजुबाजूनी येत असत. आओ मारी साथे , संता कुकडी, मग छायागीत, मग अजूनच काहीतरी, ह्यांची भेळ होऊन मग एक वेगळाच integrated आवाज ऐकू येत असे. त्यात मग खरा कोणी आवाज जास्त ठेवलाय त्याचा शोध घेत घेत मी शेरलॉक होम्स सारखी डिटेक्टिव्ह गिरी करत त्या घरात पोचायचे. अर्थात दारे उघडीच हे सांगायला नको. मग मी ऍक्शन सकट  टीव्ही चा आवाज कसा अँटी क्लॉक वाईज फिरवून तो कमी करता येईल त्याचे प्रात्यक्षिक द्यायचे. मग काही जण सहकार्य करणारे तर काही असहकार पुकारणारे. ह्यातच मग मार्ग काढत काढत मी मग ओव्हरऑल आवाज कमी झाला आहे ना, हे बघत पुन्हा घरी येऊन आपल्या जागी काहीतरी वाचायला बसत असे. 

मग तेवढ्यात नवीनच आवाज. तो म्हणजे ५ व्या मजल्यावरची integrated भांडणे आणि त्याचा आवाज. आता हे निस्तरायला मात्र मी जात नसे. बाबा किंवा कधी आई, तर कधी इतर कोणी  मग दार उघडेच असलेल्या ज्या घरातून सर्वात जास्त भांडणांचा आवाज येत असे, तिकडे शेरलॉक होम्स गिरी करत जात असत आणि जातीने दखल घेत भांडणे निस्तरत असत. 

ह्या सगळ्यातून थोडीशी सुटका करत शांतता झालीच, तर मग तेवढ्यात निर्माण झालेल्या शांततेत अजून एक आवाज येत असे. ती म्हणजे अहोरात्र वाहात राहणाऱ्या लेडी जमशेदजी रोड चा आवाज. हा मात्र कमालीच्या बाहेरचा आणि कधीकधी अस्वस्थ करणारा आवाज असे. मुश्किलीने मिळालेल्या शांततेतूनही अशांतता दर्शवणारा हा आवाज मी कधी विसरणार नाही. हा आवाज कोण बारीक करणार? तरी पाचव्या मजल्यावर आवाजाची तीव्रता नक्कीच कमी असे. परंतु फक्त किर्र रात्रीचे काही तास वगळता हा आवाज सिंगल डेकर , डबल डेकर, फेरीवाले, टॅक्सीवाले, रात्रपाळी करणारे, दिवसाची सुरुवात होता होता सूर्याबरोबरच लोकल ट्रेन पकडायला निघालेले, कधी कर्ण कर्कशः ब्रेक मारणारे, कधी लांबवरच्या मिल्स मधून आमच्यापर्यंत पोचणारे, कधी दुकानाचे शटर उघडल्याचे , कधी दुकानांचे शटर बंद केल्याचे, कधी लहान मुलांचे रडतानाचे, तरी कधी कोणीतरी धावत जातानाचे, कधी थकलेल्या पावलांचे तरी कधी उगाच लगीनघाई लागल्यासारखे हॉर्न चे. कधी दोन सिग्नल्स मधील अंतर कमीत कमी वेळात कापणाऱ्या वाहनांचे. कसलीतरी घाई. कुठेतरी पोचायची. कुठूनतरी निघायची. कधी बीएमसी ची गाडी आली गाडी करत बोंबलत जाणाऱ्या माणसांचे आणि मग भीतीने भाजीवाल्यांच्या धावपळीचे. कितीतरी आवाज. नॉइज. 

आणि मग त्यातूनच शांतता शोधणारा माणूस. बाल्कनी कम किचन काम बाथरूम अशा एका कोपऱ्यातून लांब कुठेतरी बघत राहणारे माझे बाबा. शांतता शोधात. एक कलाकार. 

सगळेच आवाज आपण शांत करायला सांगू शकत नाही. एक पूर्वी वाचले होते. दोन तेवढ्याच ताकतीचे चित्रकार. त्यांनी दोन चित्रे काढली. एकाने peace म्हणून सुंदर से देखणे असे निसर्गचित्र काढले. त्यात सगळेच निरामय. सुंदर सरोवर. सुंदर पक्षी. सुंदर फुले. असेच काही. आणि दुसर्याने डोंगराडोंगरामधून वाऱ्या खोऱ्यातून स्वतःला वाचवणारे पक्षी. कुठेतरी आडोसा घेऊन थांबलेले. हे वादळ संपले, हा घोंगावणारा आवाज संपला की  मग पुन्हा दऱ्याखोऱ्यातून फिरू, असा विचार करत. दोन्ही चित्रे सारखीच.  दोन्हींमध्ये peace, नीट बघायला गेलो तर. खरा peace कुठे असतो? मला वाटतं आपल्या अंतर्मनातच तो दडलेला असतो. कुठेतरी. कोणाबरोबर तरी. कशाबरोबर तरी. 

  आपल्या मनातही असंख्य विचार येत असतात एक वेळी. कधीकधी तर ते एखाद्या वादळी लाटेसारखे एकावर एक अक्षरशः  आदळत  असतात आणि शांतता नावाचा किनारा पटकन सापडत नाही. अथक प्रयत्न करून कधीकधी मेडिटेशन जमते. कधीतरी सजगत्या जमते. तर कधी मृगजळासारखं  ते आटोक्यातला वाटतच नाही. मग अचानक आपण जेंव्हा सोडून देतो, किंवा आवाज आणि तो noise ह्याकडे अलिप्तपाने बघायला शिकतो तेंव्हा कधीतरी युरेका क्षण येतो. 

आताशा सुद्धा मी बिल्डिंग च्या खाली असलेल्या हुंडाई शोरूम मध्ये प्रत्येक सेल झाल्यावर उच्च पट्टीत लावलेल्या आरत्यांच्या विरोधात कधीतरी शांतता मोहीम काढतेच. पण आता मी शेरलॉक होम्स नाही हे मला कळून चुकले आहे. :)

No comments:

Post a Comment