Thursday, October 24, 2013

इक धुंद से आना है एक धुंद मेन जाना है

आजोबांच्या खोलीमध्ये धुकं धुकं ...धुकं अर्थात इक धुंद म्हणजे ढगाळ, अनिश्चित, न दिसणारे, किती खोली लांबी रुंदी आहे हे माहिती नसलेले..तरीही आपण त्यातून जात आहोत असे असलेले...थोडेसे काल्पनिक, थोडेसे romantic ही, पण त्याहीपेक्षा अतर्क्य, अशाश्वत असे हे सगळेच ज्याला आपण जगणे म्हणतो. थोडेसे भीतीदायक आणि थोडेसे thrilling आणि रोमांचकारक. असेच काही अर्धवट राहणारे, कधीकधी अर्ध्यातूनच सुरु झालेले..

आज का कोण जाणे मला धुक्यातून मी चालत गेलेले असे कितीतरी क्षण आठवत आहेत...माथेरान म्हणा, महाबळेश्वर म्हणा, माझे इंग्लंड मध्ये असताना राहत असलेले घर आणि ऑफिस ह्यातला रस्ता म्हणा, की smoky mountains मधला धुक्यामधून घेतलेला drive म्हणा, एक काळजात थोडेसे धस्स व्यायचे, मग मनाचा हिय्या करून समोरच्या थोड्याच परिघातले दिसणारे चित्र बघत बघत पुढे जायचे.. मग हळूहळू पुढे काय असेल, आपण कधी आणि कसे पोचू ह्याचा विचार हळूहळू बंद व्हायचा, दिसायचे ती  फ़क़्त आपलीच पाउले, आपल्याच चपला, यायचा तो फ़क़्त आपलाच आवाज...आणि थोडासा आजू बाजूचा धुक्याबरोबर आलेल्या शांततेचा आवाज..

अशा वेळी आपला आतला आवाज जास्तच प्रकर्षाने ऐकू येतो, आणि मग त्याच्याशी दोस्ती होते, कुठून आलोत, कुठे जाणार आहोत ह्याची भीती जाऊन, आपण आपल्याला साथ द्यायची आहे हे मनातल्या मनात नक्की करतो आणि पुढच्या दिशेने एका नव्या हुरुपाने पाउल टाकतो...