Saturday, January 12, 2019

स्वयंपाक न करणाऱ्यांचा स्वयंपाक

स्वयंपाक ह्या शब्दाची फोडच स्वयं आणि पाक म्हणजेच स्वतः केलेला पाक अशी होते :-) अर्थात 'स्वतः' केलेला (ले) पदार्थ. मग आता स्वयंपाक न करणाऱ्यांचा स्वयंपाक कसा काय असू शकतो? खर तर मग तो स्वयंपाकच नाही, अगदी शब्दशः बघायला गेलो तर. पण आजकालच्या सतत ऑर्डर ऑनलाइन च्या जमान्यात स्वयंपाक करायचाय  तरी कोणाला, घरी ते पण. हे झाले दोनही एक्सट्रीम्स.

स्वयंपाकात अतिशय तरबेज आणि सक्षम असलेले स्वयंपाकघरात कितीही (इन्फिनिटी माहित्ये ना?) वेळ घालवू शकतात. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा दमलेला आनंद बघूनही मला हे वारंवार पटते की ही एक कला आहे. पाककला. आणि त्यात नुसताच पाक नाही तर असंख्य गोष्टी केल्या जातात. आणि हेही पटते की "there is a lot to learn in this my yellow kitchen" :-) बरेचदा असेही दिसते की स्वयंपाक करणाऱ्यांना प्रत्यक्ष आपण केलेल्या जेवणाचा आस्वाद घ्यायलाही फुरसत नसते किंवा तेवढा उत्साह (राहिलेला) नसतो. अर्थात हे खूप कष्टाचे आणि जिकिरीचे काम आहे. जोखीम ही खूप. आणि हेही खरे की आडात असले तरच पोहऱ्यात येते.  :-) पुन्हा काळ काम वेग सगळे आलेच. खूप मोठे मॅनेजमेंट स्किल ही आहे ह्यात. आणि चांगल्या जेवणाचा आस्वाद घ्यायला सर्वांनाच आवडतो, त्यात दाद ही मिळाली तर ती ही सर्वांनाच हवी असते. ही झाली संख्यारेषेवरची एक बाजू.

दुसरी बाजू म्हणजे अर्थातच नेहेमीच झटपट ऑर्डर ऑनलाईन, मग डिलिव्हरी ला कितीही वेळ जाओ. कितीही थंडगार येवो. शिवाय त्यावर खर्च केलेले पैसे (खर तर डॉलर मध्येच मोजले पाहिजेत :-)) आणि त्यातून मिळालेली किंमत (value for money) हेही विचार करण्यासारखेच. त्यातून जर पिझ्झा मागवला तर त्यातील गम्मतच न्यारी कारण तो थोडाफार थंडगार आणि मग त्याचे तुकडे  करण्यात खर्च होणारी शक्ती आणि त्यातून (पिझ्झ्यातून) मिळणारी ऊर्जा ह्याचे तसे गणित ही चुकेलेलंच. असो, सर्वांना आवडतो तोचि खरा :-)

दोन  टोके, सतत ऑनलाईन फूड चे प्रेमी आणि सातत्याने, रोजमरह जिंदगी में, जातीचे स्वयंपाक बनवणारे ह्यांच्या मध्ये कुठेतरी असतात ते स्वयंपाक न करता स्वयंपाक करणारे. ह्यांना मुळापासून भाजीपाल्याची आवड आहे पण स्वयंपाकघरात  रमण्याची आवड नाही. हे लोक आपल्याला काम करता येत  असेल, नसेल तरी मदतीचा हात घेऊन काम करून घेऊ शकतात आणि तेही उत्तम प्रकारे! खाणे आणि बनवणे ह्यातली मेहेनत जाणतात, आणि इतर काही स्किल्स (स्वयंपाक करायला म्हणून येणाऱ्या  मदतनिसांना समजून  घेणं  , त्यांच्याकडून काम करूनघेणं, तयारी करून घेणं , मेनू चे नियोजन ठरवणं, सतत आत्ता आहोत त्याच्यापेक्षा सुधारण्याचा घ्यास ठेवणं, आरोग्यदायी जेवण बनवून घेणे, बॅकअप थोडेफार तयार ठेवणे, जेवण हे विनातक्रार आनंदी आणि प्रसन्न मनाने जेवणं ) च्या जोरावर  स्वयंपाक आणि स्वयंपाकघर ह्याची नाव तारून नेतात.

ह्यात खर तर दोन्ही टोकाचे तसे बघितले तर आपापल्या जागी "प्युरिस्ट". आणि त्यांना आपल्या कर्तबगारीबद्दल सार्थ अभिमानही असतो. पण 'स्वयंपाक न करणाऱ्यांचा स्वयंपाक' किंवा स्वयंपाक करून घेणारे वाले मात्र त्यामानाने स्वतःबद्दल अभिमान बाळगत असले/नसले तरी त्यांची फारशी दाखल घेतली जाताना दिसत नाही.  Afterall all these are different types of skills. 'सतत ऑर्डर फूड ऑनलाईन प्रेमी' आपल्याकडच्या ऑनलाईन स्किल्स बद्दल वृथा अभिमान बाळगतात आणि मुळा, पालक दुधी ह्यांना तुच्छ लेखतात. शिवाय मिळेल तेवढी किंमत मोजायची उर्मी (आणि कधीकधी गुर्मी ) त्यांच्यात असते. प्रश्न आहे तो मिड-कॅप फंडस् चा. त्यांना तसे कुठे फार स्थान नसते. संख्यारेषेवर ते मध्यभागी असते तरी ते शून्य तर नक्कीच नसतात तर, आपापल्या जागी उत्तम असतात.

अजून एक विचारप्रवाह  फिरताना दिसतो जो म्हणजे फक्त "प्युरिस्ट" च जेवणावर सगळ्यात जास्त प्रेम करतात. किंवा त्यातले थ्रिल  सगळ्यात जास्त अनुभवतात.

पण ह्यावरही माझे स्वतःचे असे मत आहे ते म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं,  तुमचं आमचं खरोखरच सेम असतं.  जेवण हा एक प्रवास आहे. त्या प्रवासावर प्रेम करणारे बहुतेक सगळेच आहेत. मिड कॅप्स ही आहेत जे आपला मार्ग सातत्याने जपतात. त्यांच्याकडे फार काही ऑनलाईन मधून येणारे  भुरळ घालणारे पॅकिंग नाही आहे. आणि त्यांच्याकडे 'स्वयंपाक' केलेला  स्वानंद ही नाही आहे.

पण ह्याचा अर्थ त्यांचं स्वयंपाक  करण्याच्या प्रवासातले प्रेम कमी आहे असे काहीच नसते. त्यांचे कलाक्षेत्र फक्त वेगळे असते. हा लेख अशा सर्व स्वयंपाक न करता स्वयंपाक करणाऱ्यांसाठी :-) अभिमानाने जगा :-)