Thursday, August 15, 2019

पॉप कॉर्न टाइम आयेगा?

आधीचा 'अपना टाइम आयेगा', ह्या लेखानंतर नवीन काही सुचलेच नाही. आणि आता एकदम  त्याच धर्तीवर नवीन लेखाचे नाव ही सुचले, पॉप कॉर्न टाइम आयेगा??

हे पॉप कॉर्न प्रकरण मला विशेष कधी फारसे झेपले नाही. मूव्ही म्हणजे एक अनुभव असतो, एका वेगळ्याच जगात जाण्याची संधी असते आणि त्या जगात फेरफटका मारताना थिएटर एक्सपेरियन्स अजूनच चांगला वाटतो कारण त्यात दृक्श्राव्य माध्यमातून आपण खरोखरच त्या व्यक्तिरेखांपर्यंत पोचतो, त्यांचे भावविश्व अनुभवतो आणि त्यात मग छान साऊंड इफेक्ट आणि मोठा स्क्रीन नक्कीच एक जास्त वेळ टिकेल असा प्रभाव आपल्यावर टाकू शकतो.

पण हे सगळं सोडा, हे पॉप कॉर्न कुठून आले आणि तिखट झाले कळत नाही. कारण मुव्ही बघणं आणि पॉप कॉर्न खाणं हे एक समीकरणच झाले आहे, कितीतरी ठिकाणी आणि कितीतरी जणांच्या मनात. त्यातल्या काहींना खरोखरच पॉप्स आवडत असतील आणि काहींना सोशल कंडिशनिंग मुळे आवडायला लागले असतील. 

मागच्या वेळी  एकदा थिएटर च्या आत जायला रांगेत उभे असताना एक मोठाच्या मोठा पॉप कॉर्न चा पुडा आधी हिंदकाळत आला आणि मग त्या मागे त्यामागची व्यक्ती. मग ती व्यक्ती त्या तडक्यांना सांभाळत सांभाळत अचानक धडपडली आणि सगळेच पॉप कॉर्न्स भसाभसा जमिनीवर. मग थोडा फार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आणि मग पुन्हा त्या व्यक्तीचे थिएटर कडे प्रस्थान, तेही डुगडुगत. मी पॉप कॉर्न्स चा अजूनच धसका घेतला तेंव्हापासून.

आता काही वेळ गेल्यावर पुन्हा माझे ह्या गोष्टीकडे लक्ष गेले, तर आजुनबजूला पॉप कॉर्न चे वेड वाढलेच दिसले ह्या मधल्या वेळात. कदाचित तेवढ्या वेळात त्यांची ही ऑरगॅनिक पद्धतीने वाढ झालेली असावी. सोशल मीडिया मध्ये ऑर्गॅनिकली क्लीकस वाढतात तशीच. थिएटर एक्सपेन्स मध्ये एक महत्वाचा खर्च आता पॉप कॉर्न हा असावा, जो नक्कीच कमी नसतो.  'व्हॅल्यू फॉर मनी'  नक्कीच कमी. थिएटर किंवा मल्टिप्लेक्स च्या बाहेर तेच घेतले तर त्यांची किंमत १/५०० पट कमी असते. आणि तेच घरी केले तर १/१००० पॅट कमी (असे स्टॅटिस्टिकस आहेत). 

असो. आधीच  पॉप कॉर्न चे असंख्य लार्ज, एक्सट्रा लार्ज  आकारांचे बॉक्स बघून मी  त्रस्त समंध झाले होते, त्यात कधी कधी येतो तो त्यांचा सुंदरसा मिक्स वास, एअर कंडिशन मध्ये बंदिस्त असलेला. मग त्यात मसाला, चीज, मग चाट मसाला, बटर, पनीर इत्यादी. ही सगळी तारेवरची कसरत बघता बघता एक निसटता प्रश्न मनात आला, तो म्हणजे  पॉप कॉर्न टाइम आयेगा? या मुव्ही टाइम आयेगा?