Saturday, March 2, 2019

माझे डास-युद्ध

तसे मी स्वतःला अजातशत्रू मानते. माझे कोणाशी वैर नाही आणि माझ्याशीही कोणी वैर धरू नये. जे माणसांबद्दल तेच कीटकांबद्दल ही. आता छोट्या छोट्या मुंग्याच बघा उगाच पाय पडून मरु  नयेत ह्याची जमेल तेवढी काळजी घेणे, जास्त करून काळ्या मुंग्या.  काळ्या मुंग्या हे देवाचे स्वरूपच अशी एक (अंध?) श्रद्धा मी लहानपणी ऐकली होती.  त्याउलट लाल मुंग्यांना मारावेत हे अप्रत्यक्ष सिद्धतेप्रमाणाणे येतेच, त्या करकचून चावतात म्हणून. ह्या वेळी विश्वरूपदर्शन पटकन समोर येते..

असो, आता प्रश्न डासांचा आहे. आणि एकंदरीत लक्षात आले आहे मला की डासांची मजल आता ७ व्या  मजल्यापर्यंत नक्कीच पोचली आहे. त्यांनाही टेकनोलॉजि कळते आता. उगाच अंग मेहेनत करून ते आता उडत उडत येत नाहीत, मस्त पैकी लिफ्ट मधून येतात. मग हाय काय आणि न्ह्याय काय, कितवाही का मजला असेनात. तसे मी बॅगेतून ओडोमास घेऊन बागेत फिरत असतेच. हा एक passive मार्ग झाला. मग आजकालचे सगळे डासांमार्फत फिरणारे आजार बघता, इतर passive खबरदारी घेणे ही भाग पडतेच. त्या शिवाय गुड नाईट,  ऑल आउट सारखे दिशाभूल करणारी प्रॉडक्ट्स ही आहेतच की आपल्या साथीला. त्यांचा ही उपयोग फक्त मनःस्वास्थ्यासाठी होतो पण, डासस्वास्थ्यासाठी होत नाही, हेही कळून चुकले. उगाच म्हणे गुड नाईट. आणि त्यात 'ऑल आउट' ?

मग आडवळणाने जाऊन मी इतरही काही गोष्टी केल्या. उदाहरणार्थ, डासांसाठी बनवलेल्या अशा उदबत्त्या आणल्या नुकत्याच केलेल्या एका ट्रिप मधून. तीही लावली. . पण हाही तास passive mode च, डास repellant. ह्याव्यतिरिक्त ओडोमास पेक्षाही पॉवरफुल अशी इतर काही प्रॉडक्ट्स ही कळली, नुसतेच ३ डॉट्स ड्रेस ला लावायचे. की मग डास गायब. त्यांचाही फीडबॅक सो सो च.

मग मी ह्या विषयात अजून खोलात शिरायचे ठरवले. खोलात जाऊन कधीकधी निरर्थक शोध नावायची मला सवय आहेच. असेही लक्षात आले की काहींना डास चावतात तर काहींना नाही. मेरी मर्जी. मैं चाहे येह करूं मैं चाहे वोह करूं. काहींची कातडीच गेंड्याची असते तर काहींची नसते. काही जण त्यामुळे ह्या बाबतीत बेधडक वागू शकतात. मग मला हेही दिसून आले की काही जण डास सरळ सरळ जाऊन हातानेच टाळी देऊन मारतात. तेही मला करायचे नाहीये. आणि काही जण सरळ सरळ पेपर ची चापटी ठेऊन देऊ तेच कर्म करतात.

मग तीच गोष्ट हिट वगैरे वगैरे सारख्या स्प्रेज ची. पण ह्याच्यासाठीही फार प्लँनिंग  लागते. कारण झोपायच्या आधी काही तास मारून ठेवावे लागते. शिवाय पुन्हा तेच, फवारे आणि वास. आणि डास तरीही वाजत गाजत गुणगुणत हजर.

हां अजून एक passive मार्ग ही मी पत्करून बघितला तो म्हणजे, विनोदबुद्धी, जी माझी बऱ्यापैकी शाबूत आहे असे मला तरी वाटते. एकदा वाटले, ही गुनगुना रहे हैं भवर खिल रही है, ... . मग हे ही लक्षात आले की डास काही रोमँटिक भोवरा नाही, मीही शर्मिला नाही आणि मी कली कली ही नाही, किंवा असेन ही, आहे ही,  पण मी 'ती' नाही. :-)

हळूहळू मग एक अर्जुन म्हणून लक्षात यायला लागले की अखेर माझ्याकडे बॅट आहे. तशी तर मी क्रिकेटीअर पण नाही. पण मी क्रिकेट खेळले आहे स्वतःचे आणि आमच्या लहानपणच्या चाळीतल्या मित्र मैत्रिणींचे मिळून स्वतःच बनवलेले आणि लोकशाही तत्वावर आधारलेले रूल्स वापरून. आणि शिवाय हेही अचानक आठवले की मी V.J.T.I. मध्ये इंजिनीरिंग ला असताना जवळच फाईव्ह गार्डन्स मध्ये खेळल्या गेलेल्या वूमेन्स क्रिकेट match मध्ये भाग घेतला होता, आणि एक महत्वाची सिक्सर आणि एक महत्वाची विकेट मी घेतली होती. अर्थात सर्वच मुली छान खेळल्या आणि teamwork सुद्धा आणि आम्ही, as कॉम्पुटर इंजिनीरिंग टीम, जिंकलो ही. जिंकणे हरणे सोडा अर्थात, पण प्रश्न  आहे आपण कोणता मार्ग घेऊ शकतो.

आणि परत मूळ मुद्धा असा आहे की डासांचे काय? मी आता माझ्यातले विसरलेले क्रिकेटीअरत्व पुन्हा स्वतःत आणले आहे. पहिल्याच दिवशी मी वेगवेगळ्या शोधांचा चा आधार घेऊन मी माझे नवीन शस्त्र हाती घेतले आहे. थँक्स टू फाईव्ह गार्डन्स क्रिकेट ग्राउंड अँड टु चाईल्ड हूड टाइम्स क्रेझी क्रिकेट. आज मेरे पास मेरी बॅट है. समर्थ रामदासांनी म्हंटलेली एक ओळ आठवली: "मना सत्यसंकल्प जीवी धरावा". :-)