Tuesday, November 6, 2018

दिवाळी , आवराआवर आणि अदलाबदल

दिवाळी, आवराआवर आणि अदलाबदल! कुणाची? मनाची आणि घरातल्या वस्तूंची. आश्चर्य वाटले का? तसे थोडे पटकन लक्षात येणार नाही.

मनाचे आणि घरातल्या वस्तूंचे गणित. मी ह्या गणिताचे धडे माझ्या बाबांकडून शिकले.

आमचे घर अतिशय लहान होते आणि त्यामुळे स्पेस  मॅनेजमेन्ट चे आव्हान नेहेमीच समोर असे. त्यात कमीत कमी खर्चात ते करणे हेही दुसरे आव्हान.  वस्तू एवढ्या छोट्याश्या घरात त्याच त्याच दिसत राहत आणि मग त्यातून निर्माण होणारा तोचतोचपणा ही. ह्या प्रश्नाला उत्तर होते. ते म्हणजे घरातल्या वस्तूंची अदलाबदल उर्फ अफरातफर :-) कशी काय?

बदल म्हणून कधीतरी स्टूल दुसरीकडेच ठेऊन ठेवले. कधी पेन्टिंग ची जागा बदलली. कधी सोफ्याचा अँगल बदलला. कधी एखादी भिंत रंग देऊन घेतली. तर कधी घरातली म्युसिक सिस्टिम दुसऱ्या जागी ठेवली, मग तेच सूर दुसऱ्या जागेवरून म्हणून जरा नवे. तर कधी अदलाबदल , एखाद्या रंगीत शोपीस ची ब्लॅक अँड व्हाईट शोपीस बरोबर. कधी टीव्ही आणि सोफा ह्यांची अफरातफर तर कधी डिम लाईट ची शेड बदल. आणि अश्या असंख्य परमुटशन्स आणि कॉम्बिनेशन्स. अर्थात त्यातली सगळीच अस्थेटिकली छान दिसतील असे नाही . पण तरीही त्यातली प्रयत्नशीलता महत्वाची. की हे नवीन करून बघू कसे दिसतंय ते?

आता विचार केल्यावर लक्षात येते की हे एकदम भन्नाट उत्तर होते त्यावेळेच्या आव्हानांना. आणि बघायला गेलो तर आताही चपखल बसते. थोडा घरात बदल केला, वस्तू वेगळ्या ठिकाणी ठेवल्या , किंवा राऊंड रॉबिन मध्ये फिरवल्या तरी खूप छान बदल त्याच सिस्टिम मध्ये दिसू शकतात. अथात त्यामुळे आपल्याला ही रिफ्रेशेड वाटते.

ह्या वस्तूंच्या  आता मनाशी काय संबंध? तर आहे, खोलवर आहे. आपले मनही कधीकधी बंदिस्त असते. बदलांच्या शोधात असते, तोचतोच पणाला कंटाळलेले असते. आपल्याला माहीतही नसते की मनात किती धूळ साचली आहे किंवा मनालाही rearranegement  ची गरज आहे. किंवा कधी माहित असते पण आचरणात आणता येत नसते. मग काय करायचे? घरासारखेच वस्तूंची अदलाबदल आणि अफरातफर करायची का? तर हो. करायची.

करून बघायला काय जाते? बाबा म्हणायचे, स्वाती तुला कंटाळा खूप येतो बघ. ते गेल्यावर मात्र मी कंटाळ्याचेच विसर्जन केले.खैर, त्याही पेक्षा आपला मनाचा कंटाळा आपण कसा झटकून टाकू शकतो? काही विचारांची गाठोडी वरच्या वॉर्डरोबस च्या कप्यात अथवा माळ्यावर टाकून देऊ शकतो का? काही नवीन फुलांचे गुच्छ आणून आपल्या समोर दिसतील असे आणून ठेवू शकतो का? काही नवीन रातराण्यांची फुलं ओंजळीत धरू शकतो का? किंवा आपल्या मनात खोलवर दडलेली vision statements थोडी दिसतील अशी जवळ arrange करू शकतो का? किंवा काही खोलवर दडलेली दुःखे त्यांचे कप्पे ओपन करून वाऱ्यासारखी भिरकावून देऊ शकतो का? किंवा मनातल्या मनात एखाद्या नवीन ठिकाणी जाऊन येऊ शकतो का? थोडे विचार आणि त्यांचे groups वाकडे तिकडे, पुढे मागे करून आपणच आपल्या मनाच्या घराचे इंटिरिअर डेकोरेटर होऊ शकतो का?