Saturday, June 11, 2022

ऐसे कैसे ये 'ऊस का ढाबा' ?

उत्तरांचल ट्रिप मध्ये नुकतेच 'ऊस दा  ढाबा' नावाच्या एका नवीनच चालू झालेल्या रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा महायोग आला. डेहराडून च्या वाटेतच लागणारे एक रेस्टॉरंट एकदम भरपूर जागा असलेले आणि उगाचच गजबजलेले दिसले. वाटले, नक्कीच इथे छान पैकी उत्तर भारतीय जेवण उर्फ पंजाबी स्टाईल जेवण मिळेल. असाही प्रश्न डोक्यात आला की अशा आगळ्यावेगळ्या नावाचा अर्थ काय?? ऊस तर कुठे दिसत नाहीये.

 गेल्या गेल्या दिसला तो मस्तपैकी उंच काचांच्यामधून दिसणारा बाहेरचा व्ह्यू. वाटलं आता इथेच टाका तंबू! पण तेवढ्यात वेगळेच चित्र दिसले ते आपल्याकडे पाठ फिरवून बसलेल्या खुर्च्या. रिकाम्या. म्हणजे येणाऱ्या माणसांनी खिडकीकडे एकटेच त्या पाठमोऱ्या खुर्चीत बसून काचेतून बाहेरचा देखावा बघायचा. कोण्णी कोंणाशी बोलायचे आणि कोण्णी कोंणाकडे बघायचे नाही! उजवीकडे एक मोठा काउंटर आणि तिथे खूप जण गडबडीत आणि अविरत काम करताना दिसतायत.

हे सगळं शिरल्याशिरल्या पहिल्याच १-२ मिनिटात कळल्यानंतर आम्ही एक समोरचेच टेबल पटकावले. बिना व्ह्यू वाले. मग नवीनच दुसरा एक व्ह्यू समोर आला. ममोरच्या त्या काउंटर मधील लोकांमध्ये एक नुकतच 'बिझनेस' चालू केलेला आणि त्यात सपशेल गडबडलेला एक मनुष्य अस्वस्थपणे येरझाऱ्या घालताना दिसला. तो ह्या टायटॅनिक चा कॅप्टन. किंवा नुकत्याच लाँच केलेल्या आय पी एल टीम चा कर्णधार. सगळ्यात नीट नेटका तोच होता आणि आपल्या टीम मधील प्रत्येकडे जातीने दाखल देत असावा असेही वाटले.

आता आपण 'उस का ढाबा' च्या कट्ट्यावरती त्या कॅप्टन च्या क्रिकेट टीम कडे वळूया. जवळजवळ १३-१५ जणांची ही टीम सुद्धा त्या ढाब्या भर, कॅप्टन सारखीच सैरावैरा फिरत होती.  हे सगळे काय करत होते ह्याचे कुतूहल मी अजून वाढवत नाही.

कारण आम्ही आमचे टेबल पटकावताच एक उंचपुरा टीम मेंबर अचानक काहीही न विचारता ठण्णकन एक थंडगार बिसलरी ची बाटली ठेऊन देत एखाद्या चुकलेल्या चेंडू सारखा दुसरीकडे लगबगीने निघून गेला.  मग आमच्याकडे आलाच कशाला आणि काहीही ग्रीट वगैरे न  करता, हसता बिसता, आम्हाला नको असलेली पेड बिसलेरी ची बाटली थोपवत गेलाच कशाला. आलेल्या गिर्हाइकांना ग्रीट करणं , काय हवं आहे विचारणे (पाणी बिसलेरी, का साधा aqua-guard का , का साधा इच?:)) , मेनू कार्ड देणे हे प्राथमिक मॅनर्स ही नसावेत. असो.

आम्ही ही त्याला हाल्या हो करून बोलावले. मग तो एक भले मोठे (इथे नॉर्थ मध्ये सगळेच मोठे मोठे असते ) मेन्यू कार्ड ठण्णदिशी ठेवून गेला. तेही पुठ्याचे होते आणि कॉम्प्लिकेटेड होते. मला कोणतेही मेन्यू कार्ड कॉम्प्लिकेटेड च वाटते ही गोष्टी वेगळी. पण ऊस दा ढाबा चे तर अजूनच किचकट. कारण त्याची multiple versions वेगवेगळ्या टेबलांवरती होती. एक दोन जास्तीचे प्रश्न विचारल्यावर तो मग अजून गोंधळून मग त्याने finally एक त्यातल्या त्यात सगळ्यात बिनचूक version आणून आम्हाला दिले. लेटेष्ट :)

आम्हाला ही घाई असल्याने पटकन ऑर्डर केले आणि मग त्याने ते यथावकाश आणून दिले. थंड गार वगैरे. काही गोष्टी तर चक्क फ्रिज मधल्या डायरेक्ट ठेऊन दिल्या होत्या पानात.

मग इकडे काउंटर वर ipl टीम ची लगबग चालूच होती. आजूबाजूला त्यामानाने customers अजूनही दिसत नव्हते.  तरीदेखील बिलिंग काउंटर वरती उगाचच गदारोळ माजलेला. अधूनच मध्ये काही लागलं तर विचारावं म्हंटलं तरी तो ओरिजिनल वेटर त्या खिडक्यांच्या बाहेर बघत काहीतरी acting busy. मेनू कार्ड हातात. कदाचित अजून एक version काढत असावा. एक पुठयाचे एक कागदाचे एक चायनीज चे, एक उपरवाले के नाम से, ऊस का धाब्याचे. फुल्ल अँड फायनल version.

आम्हीही आटोपते घेतले. बिलिंग काउंटर वरच्या एका माणसाला तरी म्हंटलं फीडबॅक देऊया. आजकाल फीडबॅक चे फार असते. कस्टमर म्हणून कधीतरी फीडबॅक द्यायची सुरसुरी येतेच. especially अशा ठिकाणी. जिथे आता ह्यापुढे सगळेच ऊस के नाम. उर्फ उपरवाले के नाम. :)

परत कधीही इथे येणार नाही असे उगाचच मनाशी ठरवत मी बाहेर पडले.