Wednesday, December 18, 2013

मोकळ्या हवेला धुक्याची मिठी

हे असले काव्य तुम्ही बहुतेक ऐकले नसेल. आणि न ऐकलेलेच बरे, असे मला वाटते, कारण मी ते live ऐकून खो खो (रडले ) हसले आहे. तुम्हाला हे असे हसायचे असेल तर मात्र तुम्ही ते नक्कीच मिस केले ..

बर्याच जणांना आपण कवी आहोत किंवा कवयित्री आहोत हे कळल्यावर हरखून जायला होते. म्हणजे मी नवीन उदयाला आलेल्यान्बद्दल बोलत आहे. आणि त्यात तर जबरदस्तीचा audience मिळाला प्रत्यक्ष काव्य ऐकायला तर मग सांगायला च नको.  काही वेळा मोठ्या status च्या अशा  संमेलनात मग थोडे असेही काही ऐकून घ्यावे लागते..तोंड दाबून बुक्यांचा मार..

तर गोष्ट अशी आहे कि एक सुदृढ बाई ह्या संमेलनात कवयित्री म्हणून आल्या. आणि स्वतःवरच खुश होऊन त्यांनी आपली कविता वाचायला घेतली..आम्ही तेंव्हा होबार्ट मध्ये होतो..असे म्हणत तिने बरीच मोठी प्रस्तावनेची बारात प्रेक्षकांवर केली. तिथेच माझी हसून हसून आधी मुरकुंडी वळली होती कारण होबार्ट मधून बाहेर येईन ही बया आता मूळ मुद्द्यावर कधी येणार ह्या कल्पनेने मला रडू न आणण्याचे मीच ठरवले होते..

आणि शेवटी चालू झाली तिची धुक्याची मिठी..आणि नुसती चालूच नाही तर तिने त्याला चाल ही लावलेली असल्याने तिने गाणेच म्हणायला सुरु केले मोकळ्या हवेचे..ते ऐकून आम्ही ठार  वेडे होत आलेलो कारण ती चाल पूर्णपणे चोरलेली होती (आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल). आणि तिचे गाणे पण तेवढेच stage वर भयानक वाटत होते ऐकायला..

त्यानंतरचे lyrics पण हळूहळू पुढे आले..धुंद भावनेला धुक्याची मिठी..आणि पुन्हा एकदा तेच पारायण.एकदा तर वाटले की हे सगळे धुके आता अख्या सभागृहात पसरते  की काय...

तर थोडक्यात अत्यंत हसतमुखाने आम्ही हा कार्यक्रम  बघितला आणि अर्थात हसू लपवत लपवत हे सांगायला नकोच...

Sunday, December 8, 2013

कभी तनहाइयो मेन यु

तनहाई उर्फ एकटे पणा, हा तसा कित्यक हिंदी गाण्यांचा आवडता शब्द आहे. बर्याचदा तो नकारात्मक रित्या वापरला जातो..मग ती आमीर खान ची मिलो फैली हुई तन्हाई असो आणि सोनू मिगम ने त्या सर्व मिलो ना दिलेला एक सच्चा आवाज असो, वा उर्मिला चे तनहा तनहा असो आणि आशा  भोसले नि त्यात जीव  तोडून ओतलेली तनहाई असो..ही तनहाई नेहेमीच दिसत आलेली आहे. आणि ती असते ही. कधी अर्थहीन कधी अर्थपूर्ण..आणि बर्याचदा अर्थातच movies मध्ये हा शब्द ताटातूट आणि ओढ  इत्यादींशी जोडलेला असतो.

अजून एक तनहाई असते..शांत, निस्तब्ध, ज्यात आपण तेवढेच शांत आणि निस्तब्ध असतो. त्यात फारशी भावनांची चढाओढ नसते. ती तनहाई थोडी शहाणी असते. अर्थात शहाणेच असले पाहिजे असेही नसते आणि वेडी तनहाई पण तेवढीच महत्वाची असते पण ही जी शहाणी तनहाई असते ती आपल्याला आपल्या स्वतःची ओळख करून देते. आसमंतात जी नितांत शांतता भरून राहिली आहे तिच्याशी आपल्याला connect करून देते.


Thursday, October 24, 2013

इक धुंद से आना है एक धुंद मेन जाना है

आजोबांच्या खोलीमध्ये धुकं धुकं ...धुकं अर्थात इक धुंद म्हणजे ढगाळ, अनिश्चित, न दिसणारे, किती खोली लांबी रुंदी आहे हे माहिती नसलेले..तरीही आपण त्यातून जात आहोत असे असलेले...थोडेसे काल्पनिक, थोडेसे romantic ही, पण त्याहीपेक्षा अतर्क्य, अशाश्वत असे हे सगळेच ज्याला आपण जगणे म्हणतो. थोडेसे भीतीदायक आणि थोडेसे thrilling आणि रोमांचकारक. असेच काही अर्धवट राहणारे, कधीकधी अर्ध्यातूनच सुरु झालेले..

आज का कोण जाणे मला धुक्यातून मी चालत गेलेले असे कितीतरी क्षण आठवत आहेत...माथेरान म्हणा, महाबळेश्वर म्हणा, माझे इंग्लंड मध्ये असताना राहत असलेले घर आणि ऑफिस ह्यातला रस्ता म्हणा, की smoky mountains मधला धुक्यामधून घेतलेला drive म्हणा, एक काळजात थोडेसे धस्स व्यायचे, मग मनाचा हिय्या करून समोरच्या थोड्याच परिघातले दिसणारे चित्र बघत बघत पुढे जायचे.. मग हळूहळू पुढे काय असेल, आपण कधी आणि कसे पोचू ह्याचा विचार हळूहळू बंद व्हायचा, दिसायचे ती  फ़क़्त आपलीच पाउले, आपल्याच चपला, यायचा तो फ़क़्त आपलाच आवाज...आणि थोडासा आजू बाजूचा धुक्याबरोबर आलेल्या शांततेचा आवाज..

अशा वेळी आपला आतला आवाज जास्तच प्रकर्षाने ऐकू येतो, आणि मग त्याच्याशी दोस्ती होते, कुठून आलोत, कुठे जाणार आहोत ह्याची भीती जाऊन, आपण आपल्याला साथ द्यायची आहे हे मनातल्या मनात नक्की करतो आणि पुढच्या दिशेने एका नव्या हुरुपाने पाउल टाकतो...



 

Friday, September 13, 2013

आप की याद आती रही

नुकतेच एका पाकिस्तानी गायिकेने म्हंटलेले गाणे ऐकण्या आणि बघण्यात आले. एका मैफिलीत तिने हे गाणे पेश केले आहे आणि जवळ जवळ तमाम प्रेक्षकगण एकदम तल्लीन झाला आहे तिचे हे गाणे ऐकण्यात. गायिकेचे व्यक्तिमत्व पण प्रसन्न आणि हसतमुख..आणि म्हंटलेले गाणे मात्र..  आप की याद आती राही, रातभर..

मी जरा गडबडले, कारण माझ्या माहितीप्रमाणे हे गाणे गमन चित्रपटातील (@
http://www.youtube.com/watch?v=KaGj5hpFQpk) . तसे कथानक फारसे आठवत नाहीये पण त्यातले सुन्न करणारे सूर, suspended नाहीतर diminished chords...त्यातले आतुर करणारे शब्द आणि जास्त करून दिसणारे भिडणारे ते दुखः ..

असे कसे होऊ शकते..एकच गाणे आणि इतका चेहरा मोहरा बदलू शकतो? कसा, कधी, नक्की कशामुळे? मग पुन्हा पुन्हा ह्या पाकिस्तानी गायिकेच्या मैफिलीतले गाणे ऐकले,  अर्थात video सकट..( @
http://www.youtube.com/watch?v=DuS5GtpN_Ls )

हळूहळू समजत गेले कि ह्या गायिकेने त्याच गाण्याचे शब्द थोडे बदलले आहेत, chords थोड्या minor च्या major केल्यात. आणि ती जी याद आहे तिला ओढ म्हणून present केले आहे नाही कि दर्द म्हणून.

अर्थात गमन मध्ये context ही वेगळा होता. परंतु एक मस्त गोष्ट समजली ती म्हणजे नुसते कोणते सूर आपण select करतोय ह्यावर सुद्धा अख्या गणाच्या मूड चा डोलारा अवलंबून असतो. movie picturization करताना अंधार, निस्तब्ध चेहरे कधीही दुखाचेच सूर उमटवणार..ते सुधा लागतातच. आणि त्याच वेळी एखादी सिंगर एक variation घेऊन त्याच आप की याद ला नवीनच mask बसवते आणि अर्थात आपणही एकदम युरेका म्हणून दाद देतो..


 

Tuesday, July 30, 2013

कैसे केहे दु गम से घबराता नही..

एकतीस जुलै हा दिवस लहानपणापासून कित्येक वर्ष आठवणीतला राहिला..आता फ़क़्त आठवते ते त्या दिवसाचे आठवणीत राहणे.  प्रसिद्ध गायक मुहम्मद रफी ह्याची पुण्यतिथी आणि त्यानिम्मित्त आम्ही कित्येक वर्षे बघितलेला moods of rafi  हा कार्यक्रम. आमचे व्ही जे टी आई मधलेच प्रोफेसर अशोक खरे हे रफी सारखेच थोडे दिसतात, आवाज रफी सारखाच आणि त्याच style ने गाण्याचा त्यांनी प्रयत्न केला आपला आवडत्या कलाकाराला श्रद्धांजली म्हणून..

कधी कधी वाटते fan-following चा पण एक काळ असतो..एक त्या त्या वेळेची धमाल असते. रफी चा आवाज हा एक वेगळाच freshness घेऊन हिंदी चित्रपटांमध्ये आला आणि आपलाच होऊन गेला. आता त्याला मिळालेली गाणी किती दर्जेदार होती किती नव्हती का प्रश्न वेगळा. He had his own share of good bucks and back bucks. पण शम्मी कपूर, आशा भोसले, ओ पी नय्यर अशा काही काहींबरोबर त्याच्या special जोड्या होत्या ज्या एकदम प्रसिद्ध झाल्या आणि लोकांनाही त्याचा  entertainment share देऊन गेला. आमच्या घरी मुहम्मद रफी चे सगळे fan होत गेले आणि खरेंचा कार्यक्रम वर्षातून एकदा रफीला खास दाद द्यायला छान वाटायचा.

पण मग  fan-following हे आपल्या कक्षा विस्तारत जातात तसे बदलत जाते, नवीन कलाकार दिसतात किंवा कलाकृती आवडते किंवा एखादे वेगळेच world music आवडून आपण त्याच्या प्रेमात पडतो, एखादी वेगळीच irish tune आवडत जाते, थोडक्यात आपण आपले आवडी निवडींचे spectrum वाढवतो किंवा re-invent ही करतो. Explore and you will find becomes our new matra and all that.

आणि मग असाच एखादा एकतीस जुलै येतो आणि वाटते रफी साहब रफी साहब थे, अपनी जगाह पे कायम थे.

आपल्याला ज्या ज्या कलाकारांनी, musical कलाकृतींनी आनंद दिला आहे, मग ते  'आनंदी' गाणे असो, वा 'दर्दभरे' , ते सर्वच 'खरे'.

ह्या वेळी तो जोश नाही, एकतीस जुलै चा कार्यक्रम ऐकायचाच असा अट्टाहास नाही..पण तरीही आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल वाटणारे प्रेम कायम आहे.

Monday, July 1, 2013

सरहदें इंसानो के लिये है..

बोर्डर ..सीमा..खरोखरच माणसांनीच माणसांसाठी केलेल्या आहेत का? सोनू निगम ने म्हटलेल्या ह्या एका intense गाण्याचे बोल खरोखरच छान आहेत. ह्या सीमा मग खरे तर देशातल्या असतोत, राज्यांमधल्या असोत, माणसांमधल्या असोत..पक्षी, वारा ह्या सर्व निसर्गाच्या नियमांप्रमाणे जगणार्यांना थोडीच सीमांची पर्वा  असते? आणि आपण माणसे सीमान्मध्येच गुरफटून राहतो, बनवतो त्यांना, त्यावरून तुझे माझे करतो, भांडतो ही ..निसर्गाने जसे आपल्याला नेमून देले आहे तसे कमी वागतो..

मी आतापर्यंत असंख्य सीमा बघितल्या आहेत..देशा देशातल्या, राज्य राज्यातल्या ..प्रत्येक बोर्डर ला एक तिचे वेगळे सौंदर्य..आणि गम्मत म्हणजे आपल्या डोक्यात ही बोर्डर कशी असेल ह्याबद्दल काहीच्या काही कल्पना असतात, पण प्रत्यक्षात बोर्डर म्हणजे एक same continuous जमीन दिसते. लोक पण असे काही एकदम वेगळे दिसतात नाहीत त्या बोर्डर वर तरी..बरेचसे बदल हळूहळू दिसतात, मग ती बोली भाषा असो, लिहिण्याची लिपी असो, नाणी असोत, इतर units of measure असोत, खाण्या पिण्याच्या सवई असोत..किंवा belief systems असोत वा पेहेराव असो. आणि गम्मत म्हणजे कित्येक वेळा बोर्डर वरती वेगळच गाव वसते जे दोन्ही कडचे असते किंवा दोन्हीकडचे नसते..

ह्या सगळ्याचे च मला खूप अप्रूप वाटते, विमानातून जाताना तर ह्या सर्वच सीमा कितीतरी धूसर होत जातात..आणि कुठलेच बदल असे दिसत नाहीत ..दिसते ते एक मोठी continuous जमीन किंवा पाणी किंवा मोठाच्या मोठा ढग maybe..हे सगळे बघता बघता आणि अनुभवता अनुभवता आपण वार्यासार्खेच काही काळ तरी होतो..कुठल्याच सीमा matter करत नाहीत..आपण बोर्डर स्वतः बरोबर घेऊन जातो..आणि ती मग एक changing constant  बनून जाते जिला आपण हवे तसे आकारू शकतो..at least मनातल्या मनात तरी..अर्थात हे सर्व झाले काल्पनिक आणि आदर्श. प्रत्यक्षात अगदी आजच्या global citizen च्या जमान्यात सुद्धा आपण बर्याच बोर्डर्स जगतो, कदाचित जास्तच. अगदी living on the edge म्हणतात न तसेच. मी पूर्ण भारतीय नाही पण पूर्ण western ही नाही, मी मुंबईकर नाही पण पुणेकर पूर्ण नाही कारण मी एक global citizen आहे आणि पुणेकरी पाट्यांच्या चौकटीत मी बसत नाही. तो इंग्लंड चा अगदी country-sider नाही पण त्याला london ची मेट्रो लाईन चालू झाली की धसका बसतो..

मी  भारत की आखरी चाय की दुकान नावाचे interesting दुकान बोर्डर वर बघितले आहे पण त्याच दुकानामागे अजून १ इंच जाऊन पण कोणीही अजून एक भारत कि खरी खुरी आखरी चाय की दुकान काढू शकतोच की. पण तरीही हा बोर्डर बद्दल चा मामला चालूच राहणार..माणसाला थोडेच पूर्णपणे कळणार आहे कि ह्या सर्व सीमारेषा का व्यर्थ आहेत? 

Thursday, May 16, 2013

बरसेगा सावन..

येह बारीशकर भी अजीब है, इतनी देर राह देखकर फिर आता है, पर आता है तो मौसम बन जाता है..

वाट बघायची तर अशी..पावसाची बघतो तशी..खूप उन्हाळा आंबे खात खात सहन करून..:-) मनातल्या मनात म्हणत कि आयेगा आनेवाला..आपल्या टेरेस मध्ये उभे राहून लांबवरच्या हिरवळी कडे बघत  आणि त्यातून दिसणाऱ्या टुमदार घरांकडे बघत बघत आणि येणारा वारा काय सांगतो आहे ह्याची चाहूल घेत घेत. आपण शहरात राहत असून सुद्धा लांबवर ..म्हणजे अगदी लांब नाही पण थोड्याश्याच drivable अंतरावरून येणारा डोंगर दर्यातला  मातीचा वास सांगायला सुरवात करतो कि जिसका मुझे  था इंतेझार ..वोह घडी आ गई..अगदी 'पाउस' पाउस नाही आला अजून तरी त्याची चाहूल सुद्धा किती  लोभस असते..

नुसता वाराच तो अजून, तो ही उन्हामुळे भन्नाट झालेला..थोडासाच ओलावा अजून त्यात पण तरीही किती छान..झाडांशी भेटून फांद्यांमधून आवाज करत करत..मग कुठेतरी एखाद्या इमारतीवर टक्कर देत देत, एखाद्या बाल मनास भुरळ घालत घालत, कुठेतरी सकाळी सकाळी चालायला निघालेल्या आजोबांची काठी हलवून सोडत, कुठेतरी एखादी गरम गरम कॉफी लवकर थंड करत करत हा येतो..फ़क़्त आपल्याला आगा करायला की लवकरच ऋतू हिरवा येत आहे..सज्ज रहा..

आणि मग येतो वळवाचा पाउस..एक वावटळ घेऊन..सांगत की अजून थोडा वेळ थांबा..अजून चिंब पावसाने आसमंत भरून  यायला थोडा वेळ आहे. जरा थोडी उन्हाची झळ घ्या, आंबे खाऊन घ्या मग मी हा आलोच..

पुन्हा मग आंबे, पुन्हा वाट बघणे, वार्याची, गरम कॉफी थंड होऊन पुन्हा गरम करायची.. 

मग येतो तो खरा खुरा पाउस वाला वर..पश्चिमेकडून..नदीला जीवदान देत, ढगांना जान देत, वार्याला आव्हान देत, भिजत भिजत, छत्र्या उघडत उघडत  आणि रसिकांना दाद द्यायला भाग पडत..रसिकहो- तयार रहा..जमल्यास रसिकता थोडी ब्रेक वर गेली असेल तर तिला पुन्हा  बोलवून घ्या..:-)

Saturday, April 6, 2013

चिंधी amount

मध्यंतरी  एका हॉस्पिटल मध्ये  गेले होते वार्षिक हेल्थ चेकप करायला.  तिथे एक मुलगी/बाई तिची पर्स  विसरून आलेली आणि माझ्या पुढेच उभी होती. माझ्यासारखे विसरभोळे आजूबाजूला भेटले कि उगाचच दिलासा मिळतो. तिचा प्रोब्लेम होता कि ती खास वेळ काढून आणि लांबून आली होती. तिने मग लगेच भराभर नंबर फिरवले आपल्या मित्र मंडळींचे जे कदाचित तिला पटकन मदत करू शकतील. तिने आपली situation समजावून सांगितली  आणि ती situation अगदी प्रामाणिकच होती. तिला पाचशे रुपये हवे होते counter वर द्यायला. एक मैत्रीण अगदी पुढच्या दहा मिनटात आली.  म्हणाली कि पाचशे म्हणजे अगदीच चिंधी amount आहे म्हणून ती अख्खीच्या अख्खी पर्स च घेऊन आली बरेच पैसे घेऊन. मला खूप बरे वाटले तिची मैत्रीण आली ते लगेच, मी नाहीतर स्वतःच तिला offer करणार  होते. पण तरीही एक गोष्ट खटकत राहिली, आजकाल राहते, ती म्हणजे ज्या तुच्छतेने तिने पाचशे रुपयांना चिंधी म्हंटले ते. खरेच आजकाल पैशांकडे बघण्याचा आपला दृशिकोन बदलला आहे का? पैसे आहेत...आजूबाजूला..इथे तिथे...भारतात, अमेरिकेत, इंग्लंड मध्ये, ऑस्ट्रेलिया त आणि सगळीकडेच...खरोखरच पूर्वीपेक्षा आजकाल जास्त पैसे मोजून त्याच गोष्टी मिळतायत. पण कोणाला पाचशे रुपयांची, पन्नास डॉलर ची काय किंमत आहे ते  अर्थात ज्याने त्यानेच ठरवावे. आणि शिवाय प्रत्येक परिस्थिती ठरवते की जर त्या वेळेची गरज जर भागत असेल तर मग त्याची किंमत चिंधी नक्कीच नाही. आणि शेवटी पैसा ही पण खूप relative गोष्ट आहे. मिल जाये तो मिट्टी ही खो जाये तो सोना ही..अशीच.

मैत्री, वेळेला केलेली मदत, वाचलेला वेळ, वाचलेले श्रम, ऐकणारा कान, दिलेली दाद, त्याचे पडसाद, छोटेसे gift (पैशात न मोजलेले), पूर्णपणे मनापासून दिलेला वेळ  आणि अशा अनेक गोष्टी ह्या मोजमापाच्या पलीकडच्या आहेत, नाही का? पैसे, त्याची relative किंमत ही ठरवायला किंवा सांगायला हा लेख नाहीच. आपल्याला सर्वांनाच हे नक्की माहित आहे कि तो पैसा, ती नोट, आपापल्या जागी महत्वाचे आहेतच. पण कदाचित माझ्या मागच्या माणसाने तसेच दिसणारे पाचशे रुपये खूप मेहेनत घेऊन मिळवले असतील. आणि आपण काळत नकळत त्याने घेतलेल्या श्रमाचीही किंमत करत असू, अनादर करत असू, चिंधी म्हणून त्यातून मिळवलेल्या पैशाला उल्लेखून? who knows..? 

Friday, March 22, 2013

तो कौन मांगता?

हमको मेरी नाही मंगता हमको लिली नाही मंगता हम संड्रा फ्रोम बांद्रा नाही मंगता, तो कौन मांगता?

छोटीसी बात है पार अपना दिल नही समझता. हे हिंदी गाणे तसे काही फार संगीतातील मास्टर पीस वगैरे नव्हते , पण गम्मत म्हणजे त्यातील हे शब्द इंटरेस्टिंग आहेत.

 आपल्या प्रत्येकाचीच काही ध्येये असतात, उद्दिष्टे  असतात, किंवा अगदी एवढे वजनदार शब्द नाही वापरले तरी काही हव्या असलेल्या गोष्टी अस्तात. आपण कित्येक वेळा त्या अशा मांडतो (मनातल्या मनात पण) शब्दात की त्या  कळत नकळत  नकळत - आपल्याला काय नको आहे ह्याकडे झुकतात. पण मग एक प्रश्न असतो जो म्हणतो- पण नक्की हवे काय आहे? आणि ते आपण जास्तीत जास्त
बारकाव्याने define करू शकतो का? कब, कहा, कैसे?

मग एक मन म्हणत की आपल्या control च्या बाहेर  कितीतरी  गोष्टी आहेत, त्यांचे काय? त्या सर्व आपण थोडीच ह्या व्याख्यांमध्ये लिहून काढू शकणार आहोत? त्या रिस्क चे काय?

मगर भिरभी - इस बात का तो यकीन ही- के येह मुमकिन है. आपल्या मनात आपल्याला माहिती आहे त्यापेक्षा बर्याच जास्त capabilties आहेत. आपण जे बघतो ऐकतो फील करतो हे सर्वच एका मोठ्या giagiantic computer सारखे आपल्या मनात store केले जाते. आपण जे भविष्यात डोकावून बघतो, ऐकतो , फील करतो हे सुद्धा त्यातलेच एक. एक कलाकार जसे हळूहळू चित्र रंगवत जातो तसेच आपण सर्वच जण काही न काही चित्र रंगवत असतो. आणि आपल्याला जे हवे आहे ते साकारण्यात की चित्रे, ह्या feelings , आपल्याला खूप हातभार लावू शकतात. म्हणूनच म्हणतात न- be careful what you ask for, you might just get it .






Friday, March 15, 2013

सूर येती, विरून जाती

कंपने वार्यान्वारी, हृदयावरी..

खरोखरच, हे तावून सुलाखून जमलेले सूर सारे मनावर कब्जा करणारे असतात..मग ते हृदयनाथ मंगेशकर सारख्या आपल्या मातीतल्या कसलेल्या संगीतकार आणि गायकाचे असोत, वा मग तो आपलाच वाटणारा व्हान्जेलीस किंवा यांनी असोत, ते इतके प्रभावी असतात की आपल्याला हसवतात, रडवतात, मनाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात आणि तिथून खरे तर कधीकधी परतच येऊन नये असे वाटते. असे वाटते काहीतरी नवीन सांगत राहावे त्यांनी आपल्याला, आपण काहीतरी नवीन बोलत राहावे त्यांच्याशी शांतपणे, काहीही न बोलता. आपले एक स्वतंत्र विश्व असते ना  ते..एकदा आपण आपल्या कार च्या खिडक्या बंद केल्या,  कि संवाद सुरु, बाहेरचा आवाज बंद! एकदा एक हेडफोन कानात घातला कि अजूनच जास्त बारकावे समजणार, मनाला भिडणार. आणि अगदीच आपल्याला असे एकाग्र करून घेता येणार नसेल सुरांच्या  प्रदेशात जाण्यासाठी, तर मनातल्या मनात आजूबाजूच्या आवाजांचे ignore button on करायचे प्रयत्नपूर्वक. की मग ह्या गाण्यात विचारल्या प्रमाणे त्या स्वरांचा स्वामी कोण , असा प्रश्नही पडत नाही.  आपण स्वामी आहोत असेही वाटत नाही आणि आपण स्वरांशी एकरूप होतो. कधी त्या सूरांमधील mood आपण बनतो, कधी आपला mood ते सूर घेतात आणि राहतो तो एक फ़क़्त ओमकाराचा सूर, ज्यातून कदाचित  हे सर्वच  निर्माण झाले आहे.

सुरांशी नाते म्हणजे असेच असते, जे खरे तर शब्दात  सांगता येणार नाही, पण जे ह्या वाटेवर आहेत, सुरांच्या वाटेवर, त्यांना एक पर्वणी आहे, कारण  खूप हळुवार वाटा आहेत आणि खाचखळगे कमी आहेत, मग ते सूर विरून जाणारेच का असेनात?



Tuesday, March 12, 2013

टेक अ ब्रेक

एकदम छान टीम होती आमची ती. ऑफिस सुद्धा एकदम कोणालाही आवडेल असे, प्रशस्त, आणि प्रसन्न वाटेल गेल्यागेल्या, असे. सगळेच आपापल्या कामात चांगले आणि एकमेकांतील कामातील approach वरून असलेले वाद सुद्धा मुद्देसूदपणे मांडणारे आणि ते resolve करणारे. मग घोडे कुठे अडले?

घोडे ब्रेक न घेतल्यामुळे अडले :-) शिकागो मधील आमचे workshop रंगत आलेले. अगदी जेवणाचाही ब्रेक न घेता किंवा विशेष लक्ष देऊन न जेवता..कॉफी प्यायली तरी कामाच्याच गप्पा..आणि तीच रंगत..थंडी वार्याची पण तमा न बाळगता आम्ही काम करत होतो..अर्थात मजा येत होतीच पण एका भल्या क्षणी माझ्या लक्षात आले की आता बस्स..म्हणजे काम थांबणे किंवा टीम सोडणे नाही पण ब्रेक घेणे. माझा हक्काचा. स्वतःचा. थोडेसे मोकळे आकाश बघण्याचा. जरा बाहेरची मस्त हवा खाण्याचा. कामाबद्दल न बोलण्याचा. आणि आपला आपला lunch शांतपणे दहा मिनिटे का होईना पण तरी एकटेच घ्यायचा. एकटे का, कारण मला working lunch मधून ब्रेक कोणी आपण हून दिला नसता ह्याची मला खात्री होती. माझे 'कॅलेंडर' आणि माझ्यासारख्या सर्वांचेच कॅलेंडर पहाटेपासून अगदी रात्री उशिरा पर्यंत ओपन होते सर्वांसाठी मिटिंग ठेवायला.

आपण कितीतरी वेळा म्हणत असतो मला आता एक ब्रेक हवा आहे, कशापासून तरी आणि कशापर्यंत तरी. आणि खरोखरच असा ब्रेक एकदम आपल्याला refresh करतो. मग तो कोणत्याही रुटीन म्हणवल्या जाणार्या गोष्टीतून असो. छोटा असो कि मोठा असो. लागतो एवढा नक्की. किती कुठे कसा हे प्रत्येक जण स्वतःसाठी ठरवतो. अर्थात ही झाली कामातील गोष्ट. आणि तेही आवडणाऱ्या. मग न आवडणाऱ्या कामातील ब्रेक बद्दल न बोललेलेच बरे...

घरून काम करणे अर्थातच work-from-home वाल्यांसाठी ही ब्रेक ची कल्पनाच पूर्णपणे बदलते. ब्रेक हवा असतोच पण तो घराच्या भिंतींपासून, आपल्या laptop पासून, आपल्या virtual co-workers पासून ज्यांना आपण कधीच भेटलेलो नसतो किंवा भेटणार नसतो..माझ्या एका घरून काम करणाऱ्या manager ने अगदी योग्य शब्दात सांगितले होते कि जेंव्हा तिला समजले कि तिला आता ऑफिस मधून काम करणे थांबवून पूर्णपणे घरून काम करावे लागणार आहे तेंवा तिला असे वाटले कि - as if it was a half death for her. कारण आता ब्पहिला प्रश्न पडला कि कामातून ब्रेक घेणार कुठे कसा कधी आणि कुठे? अर्थातच हळूहळू ह्या नवीन model मध्ये सुद्धा तिने ब्रेक घेण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढले. म्हणतात न गरज ही शोधाची जननी असते. ब्रेक ची गरज राहतेच फ़क़्त पद्धत बदलते.

So remember to take a break and have a kit-kat, but stay refreshed :-) bye!!


Tuesday, February 26, 2013

त्या फुलांच्या ...

सुरवातीला कितीतरी वेळ माझा असा समज होता की 'त्या फुलांच्या गंधकोशी' हे गाणे प्रियकर प्रेयसी ह्यांच्यातील आहे, नंतर समजले कि हे देवाला उद्देशून लिहिले आहे. अर्थात कवी किंवा लेखक जे लिहितो त्यातून वाचक आपला हवा तो अर्थ नक्कीच काढू शकतात आणि तीच तर गम्मत आहे. निसर्ग हाच देवाच्या जागी मानला आणि सृष्टीतील विविध रुपे देवाचीच वेगवेगळी रूपे मानली तर मग वेगळे खास देवळात जायलाच नको ..? 

असो, माझ्यासाठी valley of flowers हा असा एक अनुभव होता ज्यात  मी निसर्गाच्या आणि माझ्या मनातल्या देवाच्या खूप जवळ गेले आणि नवीन होऊन परत आले. माझ्या office मधला एक सहकारी आणि मित्र हिमाचल प्रदेशात पाला-बडा  होता आणि तो एक दिवस ह्या जागेबद्दल सांगत होता, फोटो सुद्धा  होते त्याच्याकडे आणि मी ठरवला  कि तिथे  जायचेच एकदा. आणि खरोखरच जायचा योग आला. तिथल्या ट्रेक बद्दल जरा घबराहट होती थोडी- पोचेपर्यंतच जीव मुठीत असतो वगैरे वगैरे..ऐकलेले बोललेले. बर्याच चुकीच्या कल्पना ही  होत्या..वाटलेले कि अशा जागी ट्रेक करणारा  म्हणजे जास्त करून तरुण  वर्गच असेल - ट्रेक ग्रुप मध्ये (आपल्यासारखा) . तरुण वर्ग नक्कीच होता जास्त करून, पण मनाने. जवळजवळ पन्नाशीच्या आसपासचे कित्येक  हौशी base-camp var, आणि गम्मत म्हणजे ३० जणांपैकी ५ वयाने तरुण आणि उरलेले चिरतरुण...आणि हो त्यातलीच एक म्हणजे माझी सहप्रवासी - माझी एक सत्तर वर्षीय आजी. मला आणि माझ्या मावसभावाला बरोबर  'सोबत' म्हणून आलेली आणि सर्वात 'तरुण' . :-)

पुढे ह्या trip बद्दल बरेच काही लिहिण्यासारखे आहे पण आता वयाप्रमाणे memory chips साथ देत नाहीत ..हा हा हा, ११ वर्ष होऊन गेली ना ह्या 'त्या फुलांना'. एक मात्र नक्की की तिथला तो निसर्ग, हिमालयाचा अथांग पणा, मोठ्ठे च्या मोठे खुले आकाश, अलकनंदा आणि अशा अनेक भगिनी नद्या त्यांचे एकत्र येणे लांब जाणे अजूनही अगदी डोळ्यांसमोर  आहे..आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्या trip मधला तरुणपणा, जो माझ्या 'तरुणपणापर्यन्त' मला साथ देईल...

Saturday, February 23, 2013

ह्या चिमण्यांनो

एकदा असेच गम्मत म्हणून चिमण्यांची नक्कल केली, हेबेहूब त्यांचा आवाज जमला असावा. माझी मुलगी खूप खूष झाली माझ्या नकलेवर, आणि अचानक आजूबाजूच्या झाडांमधून चिमण्यांचा  अदृश्य घोळका माझा प्रतिध्वनी बनला..कुठे होत्या ह्या सर्व चिमण्या नक्की माहित नाही, पण आजूबाजूला बरीच झाडे आहेत जुनी आणि मोठी त्यातच कुठेतरी दडल्या असाव्यात ...अगदी अनपेक्षितपणे माझ्या चिमण्यांना म्हणून न दिलेल्या सादेला खुद्द चिमण्यांकडून प्रतिसाद मिळाल्यावर मी ही भन्नाट खुश झाले. माझी मुलगी जरा गडबडली कि हा दुसरा आवाज कसा काय आणि कुठून आला..मग एकाच खेळ चालू झाला. माझी त्यांना मारलेली हाक आणि त्यांच्या प्रतिसाद. एक एक करत एक नैसर्गिक resonance निर्माण झाला आसमंतात आणि मी त्याच्यात हरखून गेले. आजूबाजूचे सगळेही हा खेळ enjoy करायला लागले. मग लक्षात आले कि ह्या चिमण्या ही एका सादेची वाटच बघत होत्या की, आणि ती मिळाल्यावर मोकाट सुटल्या mad सारख्या :-) शेवटी म्हणावे लागले- ह्या चिमण्यांनो परत फिरा रे..

Thursday, February 21, 2013

जाईन विचारित रानफुला

रानफुलांबद्दल मला एक खास जिव्हाळा वाटत राहिला आहे, असेच एखाद्या लांबच्या लांब ट्रेक ला जाताना एखादे मोठ्ठे हिरवेगार पठार लागते, त्यावरून आपण अगदी भुरभुरणाऱ्या पावसात चालत राहतो, agendaless, आणि वाटेत कडेला अगदी छोटी छोटी शी अशी ही सहज कदाचित दुर्लक्षित होऊ शकतील अशी साधी सुधी फुले असतात, पांढरी शुभ्र . पण त्यांच्याकडे एकदा लक्ष गेले कि ती एकदम मन टवटवीत करून टाकतात. मस्त बिनधास्त आकाशाकडे बघत डोलत असतात आणि त्यांच्याकडे कोणी बघो वा न बघो, आपल्या आपल्या धुंद्दीत असतात..आणि हो अगदी सर्व हिरवेगार असते तेंव्हाच ही अशी असतात असे नाही, एखाद्या माळरानात सुधा ती अशीच खुलून असतात...एखाद्या उन्हा तान्ह्याच्या दिवशीही ती अशीच दिसतात,  मग अशा वेळी त्यांना बरेच काही विचारत जावेसे वाटते..त्यांच्याशी हितगुज साधावेसे वाटते..विचारावेसे वाटते, काय शिकता तुम्ही दररोज, काय गोष्टी तुमचा एखाद्या गोष्टीकडे  बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मकरित्या बदलतात? काय गोष्टी तुमची प्रतिभा आणि प्रतिमा साकारतात? असे बरेच काही..मग मग लक्षात येते कि आपल्या प्रत्येकाच्या मनातदेखील अशी अनेक रानफुले दडलेली असतात..आणि आपण भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तींमध्येही. गोष्ट सोप्पीच असते, पण दुर्लक्षित असते कधीतरी, अशाच बर्याच उन पावसातीत रानफुलांच्या गोष्टी /घटना सांगण्यासाठी हा blog सुरु करण्याचा एक प्रयत्न.