Saturday, February 29, 2020

शिट्टी

शिट्टी म्हणजे शिट्टी म्हणजे शिट्टी असते, तुमच्या आमच्या कुकर ची  सेम असते :-) पण खरंच असते का? काही जणांना शिट्टी ही जागच्या जागी मिळते. मग ती एकवचनी असो का अनेकवचनी. म्हणजे साध्या कुकर ची एक शिट्टी असो किंवा थोड्याश्या वेगळ्या अशा वेगवेगळ्या कूकर्स च्या वेगवेगळ्या शिट्ट्याअसोत. त्या मिळणार म्हणजे मिळणारच एकाच जागी. अगदी आदर्श म्हणजे ज्या कुकर ची शिट्टी असेल त्या कुकर च्याच झाकणाबरोबर अडकवलेली. असतात काही कूकर्स आदर्श :-) आणि ते कुकर मेन्टेन करणारे ही. आणि त्याच बरोबर अजूनही एक प्रकारची माणसं असतात ज्यांच्या स्वयंपाकातील तब्बल २० सुरवातीची मिनिटं शिट्टी शोधण्यात जातात. मग आखिर कर ही शिट्टी कुठेतरी अडगळीत मिळते. असो तर प्रत्येक शिट्टीच्या वेगवेगळ्या तर्हा.

पण अर्थात ही शिट्टी ची भट्टी इथे खरी सुरु होते. कारण शिट्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन आपापल्या प्रकृतीप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. गॅस चालू होतो तेंव्हापासूनच काही जण उगाचच गॅस वर असतात, कधी शिट्ट होणार कधी शिट्टी होणार. तब्बल दहा मिनिटं होऊन  गेली , अजून ती झाली नाही :-) मग अजून टेन्शन. मग उगाचच भिरभिरल्यासारखा कुकर जवळून येरझाऱ्या घालणे वगैरे वगैरे. मग एकदाची पहिली शिट्टी होते. मग तर  खरा  लपंडाव चालू होतो. कारण एकदा भट्टी जमली की मग शिट्ट्या भरभरच होणार. पण तरीही काही जण मध्येच येऊन गॅस बारीक बारीक करून जातात. मग बारीक लक्ष ठेवतात. मग पुन्हा काही वेळ  शांतता शिट्टी चालू राहते. मग मात्र नो लूकिंग बॅक. हे सगळं होत असताना हे लोक अतिशय त्रस्त असतात कारण शिट्टी होणं आणि गॅस बंद करणं ह्यावरच ते लक्ष केंद्रित ठेवतात. Goal-centric, you know. :-)

आता काही जण अतिशय निर्धास्त असतात शिट्टी बद्दल, मी बारकाईने बघितलं आहे की त्यांना ढम्म नसतं, कि शिट्टी होत्ये का नाही, किती शिट्ट्या होतायत, कधी होतायत वगैरे वगैरे. 'संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही..', अशा अविर्भावात. मग अशा वेळी बाकीचे अजुनबाजूचे टेन्शन घेतांना  दिसतात.म्हणतात ना, 'Problems in the universe remain constant, they just get transformed from one problem domain into another', तसंच.  

आणि अजूनही काही जणं असतात जी मात्र शिट्टी बद्दल apt-relaxed असतात. म्हणजे काय उगाच काहीतरी नवीन टर्म का? तर हे जणं शिट्टीशी एकरूप असतात. आपापली कामे चालू ठेवत शिट्ट्यांबद्दल जागरूक असतात, आणि योग्य वेळ येताच कूकर शांतपणे बंद करतात. आणि एवढे थंड राहूनही आतले जिन्नस, म्हणजे मोस्टली भात , वरण भात एकदम व्यवस्थित शिजलेला असतो. काय जादू ना?

तर अशी ही कूकर ची भट्टी . जमली तर जमली.  तुम्ही कोण, पुणेकर का मुंबईकर का नागपूरकर? :-) काहीही असो, एक नक्की कि आजकालच्या anxiety जमान्यात शिट्टी सारख्या क्षुल्लक गोष्टीवरून तरी आपला जीव आटवून रक्तदाब वाढवून घेऊन नये एवढेच मनापासून वाटते. :-)