Monday, September 24, 2018

व्यक्ती आणि वल्ली आणि सवयी

कधीपासून व्यक्ती आणि वल्ली आणि त्यांच्या (त्रस्त करणाऱ्या) सवयी ह्यांबद्दल लिहायचे होते. विषय तसा नाजूकच. प्रत्येकाला आपल्या (इतरांना त्रस्त करणाऱ्या) सवयीनबद्दल नेहेमीच त्या बरोबरच आहेत असे वाटत  असते. पण त्याच  दुसऱ्या व्यक्तीला पराकोटीचे त्रस्त करू शकतात हेही तेवढेच शाश्वत सत्य आहे. आणि अशा प्रत्येक गलिच्छ सवयीला एका जास्त अक्सेप्टेबल लेव्हल मध्ये परावर्तित करणेही तेवढेच शक्य असते. अर्थात तेही मनात आणले तर.

आता मचामचा आवाज करत खाण्याचेच बघा ना. कित्येक जण अशक्य कोटींचे आवाज करत खातात आणि त्यांचा नक्कीच इंटरफरन्स आजूबाजूच्यांना होऊ शकतो.  हाच आवाज एका ठराविक पद्धतीने खाऊन कमी करता येतो पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? तेच तोंडातला घास इतरांना दिसणे अथवा दाखवणे ह्या सवयीचे. का असा करताय लोकं? एकतर त्यांना माहीतच नसते की ही सवय चांगली नाही, किंवा त्यांना ते मान्य करून कॉन्व्हर्ट व्हायचे नसते. तुम्ही कोण आलात आम्हाला सांगणारे? मग हे ऐसेची चालायचे!

अजून एक खास निदर्शनात आणून देण्यासारखी सवय म्हणजे ढेकर. मी लहान असल्यापासून ढेकर आली का आला ह्या वादातीत विषयावर विविध चर्चा ऐकल्या आहेत (ज्या मला निरर्थक वाटल्या :-), तेंव्हाही आणि आताही ). ढेकर चे लिंग ओळखण्यापेक्षाही व्यापक प्रश्न ह्या जगात आहेत ते म्हणजे ढेकर देताना आवाज करू नये किंवा आलाच आवाज तर तो दाबून टाकणे आणि तसेही न करता आले तर सॉरी तरी म्हणणे हे एक ट्रान्सफॉरमेशन प्रोजेक्ट आहे. अर्थात तेही जर मनात आणले तरच.  तुम्ही कोण आलात आम्हाला सांगणारे? मग हे ऐसेची चालायचे! अशाच प्रकारच्या "दुसऱ्या प्रकारच्या" पादा-वाजाचेही तेच. पण मुळात सेल्फ-अडमिटन्स अशा वेळी कमी पडतो. ह्याच "फिबोनाची सिरीज (गणितातली एक नंबर सिरीज)" मध्ये मग तोंडावर खोकणे, शिंकणे, घसा जोरजोरात खाखरणे, चप्पल फरफटवत चालणे, मेटल च्या खुर्च्या खराखरा ओढणे, इत्यादी  नंबर्स ही येतात. ह्यात नैसार्गिग आणि अपरिहार्य गोष्टी सोडल्या तरी देखील इतरांना त्रास होऊ नये एवढी खबरदारी अपेक्षित असते. उदाहरणार्थ खोकणे नैसर्गिक पण स्वतःच्या तोंडावर हात न ठेऊन खोकणे हा एक परमार्थ. 

अजूनही एक सवय खास लक्षात आणून देण्यासारखी ती म्हणजे उदबत्त्या आणि अत्तरे. दोन्हींचे उद्दिष्ट चांगलेच. पण भस्काभर उदबत्त्या लावून अख्खी  खोली व्यापून टाकून एक आगळाच आनंद मिळत असावा, पण त्याचे दुष्परिणाम त्या फवाऱ्याच्या दुसऱ्या एन्ड ला असलेल्या "ऑडीएन्स " ला भोगावे लागतात. आता मग एकतर प्रोऍक्टिव्हली सांगणे, सहन करणे किंवा घमघमाट आणि धूर ह्यातून बाजूला निघून जाणे हेच उपाय शिल्लक राहतात. 

तर अशी ही फिबोनाची सिरीज चालूच राहते आणि माणसाची फरफट ही. गम्मत म्हणजे कोणीच व्यक्ती परफेक्ट नसते; आणि अशा असंख्य व्यक्ती आणि वल्ली ना आपण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मध्ये भेटत असतो. इतरांना आपला त्रास होऊ नये अशी थोडीतरी भावना प्रत्येकानेच ठेवली तर सगण्यांसाठीच transformation आणि continuous improvement  चालू राहू शकते. नाहीतर, तुम्ही कोण आलात आम्हाला सांगणारे? मग हे ऐसेची चालायाचे!