Thursday, August 15, 2019

पॉप कॉर्न टाइम आयेगा?

आधीचा 'अपना टाइम आयेगा', ह्या लेखानंतर नवीन काही सुचलेच नाही. आणि आता एकदम  त्याच धर्तीवर नवीन लेखाचे नाव ही सुचले, पॉप कॉर्न टाइम आयेगा??

हे पॉप कॉर्न प्रकरण मला विशेष कधी फारसे झेपले नाही. मूव्ही म्हणजे एक अनुभव असतो, एका वेगळ्याच जगात जाण्याची संधी असते आणि त्या जगात फेरफटका मारताना थिएटर एक्सपेरियन्स अजूनच चांगला वाटतो कारण त्यात दृक्श्राव्य माध्यमातून आपण खरोखरच त्या व्यक्तिरेखांपर्यंत पोचतो, त्यांचे भावविश्व अनुभवतो आणि त्यात मग छान साऊंड इफेक्ट आणि मोठा स्क्रीन नक्कीच एक जास्त वेळ टिकेल असा प्रभाव आपल्यावर टाकू शकतो.

पण हे सगळं सोडा, हे पॉप कॉर्न कुठून आले आणि तिखट झाले कळत नाही. कारण मुव्ही बघणं आणि पॉप कॉर्न खाणं हे एक समीकरणच झाले आहे, कितीतरी ठिकाणी आणि कितीतरी जणांच्या मनात. त्यातल्या काहींना खरोखरच पॉप्स आवडत असतील आणि काहींना सोशल कंडिशनिंग मुळे आवडायला लागले असतील. 

मागच्या वेळी  एकदा थिएटर च्या आत जायला रांगेत उभे असताना एक मोठाच्या मोठा पॉप कॉर्न चा पुडा आधी हिंदकाळत आला आणि मग त्या मागे त्यामागची व्यक्ती. मग ती व्यक्ती त्या तडक्यांना सांभाळत सांभाळत अचानक धडपडली आणि सगळेच पॉप कॉर्न्स भसाभसा जमिनीवर. मग थोडा फार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आणि मग पुन्हा त्या व्यक्तीचे थिएटर कडे प्रस्थान, तेही डुगडुगत. मी पॉप कॉर्न्स चा अजूनच धसका घेतला तेंव्हापासून.

आता काही वेळ गेल्यावर पुन्हा माझे ह्या गोष्टीकडे लक्ष गेले, तर आजुनबजूला पॉप कॉर्न चे वेड वाढलेच दिसले ह्या मधल्या वेळात. कदाचित तेवढ्या वेळात त्यांची ही ऑरगॅनिक पद्धतीने वाढ झालेली असावी. सोशल मीडिया मध्ये ऑर्गॅनिकली क्लीकस वाढतात तशीच. थिएटर एक्सपेन्स मध्ये एक महत्वाचा खर्च आता पॉप कॉर्न हा असावा, जो नक्कीच कमी नसतो.  'व्हॅल्यू फॉर मनी'  नक्कीच कमी. थिएटर किंवा मल्टिप्लेक्स च्या बाहेर तेच घेतले तर त्यांची किंमत १/५०० पट कमी असते. आणि तेच घरी केले तर १/१००० पॅट कमी (असे स्टॅटिस्टिकस आहेत). 

असो. आधीच  पॉप कॉर्न चे असंख्य लार्ज, एक्सट्रा लार्ज  आकारांचे बॉक्स बघून मी  त्रस्त समंध झाले होते, त्यात कधी कधी येतो तो त्यांचा सुंदरसा मिक्स वास, एअर कंडिशन मध्ये बंदिस्त असलेला. मग त्यात मसाला, चीज, मग चाट मसाला, बटर, पनीर इत्यादी. ही सगळी तारेवरची कसरत बघता बघता एक निसटता प्रश्न मनात आला, तो म्हणजे  पॉप कॉर्न टाइम आयेगा? या मुव्ही टाइम आयेगा? 

Saturday, June 15, 2019

अपना टाइम आयेगा

नुकत्याच केलेल्या ट्रिप मध्ये अपना टाइम आयेगा हे गाणे नीट ऐकले आणि डोक्यात पक्के बसले. गाण्याचा ताल, सरळसोट पणे एकाच सुरात म्हंटलेले रॅप , हळूहळू आवडायला लागले. गाण्यातला फोर्स जबरदस्त वाटला. रॅप सिंगिंग शी जरी मी तेवढी परिचित नसले तरीही अमेरिकन रेडिओ चॅनेल्स वर खूप दा रॅप ऐकले होते. कदाचित ही टर्म म्हणून तेवढी माहित नसेल. तर ह्या गाण्यातले अजून एक लक्षात राहण्यासारखे म्हणजे, त्याचे शब्द, जे बहुतेक सर्वच  रॅप गाण्यांमध्ये एकदम कट्यार काळजात घुसली असे असतात, राऊडी, बरेचसे टोकदार आणि तरीही अचूक आणि त्यातला भाव आणि सत्यपरिसथिती बेधडक समोर आणणारे.

कळत नकळत त्या गाण्याच्या डान्स पार्ट कडेही  वळले.मग लक्षात आले की ह्या गाण्यावर डान्स करायला ही बेफाम स्कॉप आहे, आणि तो कसाही असेल, पण त्यात एक नक्की असेल, तो म्हणजे त्यातला फोर्स, वाईल्डर्नेस .

करता करता गल्लीबोय मूव्ही ह्यात हे गाणे चित्रित केले आहे तो बघितला. खरं तर फक्त ह्या गाण्यासाठी. रणवीर सिंग बद्दल खास आत्त्मियता नसूनही मी हे धाडस केले. एका गाण्यासाठी मी खूप काही आउट ऑफ वे जाऊन कधीकधी मी असे काही करते आणि बऱ्याचदा काहीतरी नवीन मिळून जाते. अमेरिकेत असताताना माइल्स ऑफ स्काय ह्या एका सेल्टिक गाण्यासाठी मी अख्खी अनोळखी सी डी विकत घेतली होती. आणि असेच काही नवीन प्रयोग. तर 'अपना टाइम आयेगा' गाण्यासाठी साठी मूव्ही बघता बघता लक्षात आले की मला आधी वाटलेले तशी धारावी आणि काहीतरी व्हायोलन्स टाईप काहीच नव्हते, होते फक्त रॅप. आणि तेही रणवीर सिंग ने साकारलेल्या इंटेन्स रॅप सिंगर च्या स्वरूपात. एकदम साधा रोल आणि माझी त्याच्याबद्दलची आधीची बरीचशी गृहीतके मागे सारत सारत तो मला गल्लीबोय म्हणून एकदम आवडून गेला.

कितीतरी वेळा वाटते हे अपना टाइम आयेगा मधले लिरिकस खरेच आहेत. उठ जा अपनी राख से- बेचिराख धारावी जी आपल्याला विमानातूनच मुंबई त येताना धडधडत दिसते त्याबरोबरच येणाऱ्या कित्येक ग्रासरूट प्रश्नांशी  सामना करत, 'उड जा अब  तलाश  में'.  'अपना टाइम आयेगा'. 'जिंदा मेरा ख्वाब अब कैसा तू दफनयेगा।'
 . 
असे बरेच रोख टोक सवाल!!!

एक सेंट्रल थिम ह्यात आहे जी सर्वसामान्यांना कुठेतरी म्युसिक च्या माध्यमातून जवळ आणते ती म्हणजे एक आशा. एक उम्मीद, या कई सारी उम्मीदे जिनपर दुनिया कायम है . प्रत्येक क्षणाला एक आशा आहे म्हणून जिवंतपणा आहे. आखिर कर, अपना टाइम आयेगा! 

Saturday, March 2, 2019

माझे डास-युद्ध

तसे मी स्वतःला अजातशत्रू मानते. माझे कोणाशी वैर नाही आणि माझ्याशीही कोणी वैर धरू नये. जे माणसांबद्दल तेच कीटकांबद्दल ही. आता छोट्या छोट्या मुंग्याच बघा उगाच पाय पडून मरु  नयेत ह्याची जमेल तेवढी काळजी घेणे, जास्त करून काळ्या मुंग्या.  काळ्या मुंग्या हे देवाचे स्वरूपच अशी एक (अंध?) श्रद्धा मी लहानपणी ऐकली होती.  त्याउलट लाल मुंग्यांना मारावेत हे अप्रत्यक्ष सिद्धतेप्रमाणाणे येतेच, त्या करकचून चावतात म्हणून. ह्या वेळी विश्वरूपदर्शन पटकन समोर येते..

असो, आता प्रश्न डासांचा आहे. आणि एकंदरीत लक्षात आले आहे मला की डासांची मजल आता ७ व्या  मजल्यापर्यंत नक्कीच पोचली आहे. त्यांनाही टेकनोलॉजि कळते आता. उगाच अंग मेहेनत करून ते आता उडत उडत येत नाहीत, मस्त पैकी लिफ्ट मधून येतात. मग हाय काय आणि न्ह्याय काय, कितवाही का मजला असेनात. तसे मी बॅगेतून ओडोमास घेऊन बागेत फिरत असतेच. हा एक passive मार्ग झाला. मग आजकालचे सगळे डासांमार्फत फिरणारे आजार बघता, इतर passive खबरदारी घेणे ही भाग पडतेच. त्या शिवाय गुड नाईट,  ऑल आउट सारखे दिशाभूल करणारी प्रॉडक्ट्स ही आहेतच की आपल्या साथीला. त्यांचा ही उपयोग फक्त मनःस्वास्थ्यासाठी होतो पण, डासस्वास्थ्यासाठी होत नाही, हेही कळून चुकले. उगाच म्हणे गुड नाईट. आणि त्यात 'ऑल आउट' ?

मग आडवळणाने जाऊन मी इतरही काही गोष्टी केल्या. उदाहरणार्थ, डासांसाठी बनवलेल्या अशा उदबत्त्या आणल्या नुकत्याच केलेल्या एका ट्रिप मधून. तीही लावली. . पण हाही तास passive mode च, डास repellant. ह्याव्यतिरिक्त ओडोमास पेक्षाही पॉवरफुल अशी इतर काही प्रॉडक्ट्स ही कळली, नुसतेच ३ डॉट्स ड्रेस ला लावायचे. की मग डास गायब. त्यांचाही फीडबॅक सो सो च.

मग मी ह्या विषयात अजून खोलात शिरायचे ठरवले. खोलात जाऊन कधीकधी निरर्थक शोध नावायची मला सवय आहेच. असेही लक्षात आले की काहींना डास चावतात तर काहींना नाही. मेरी मर्जी. मैं चाहे येह करूं मैं चाहे वोह करूं. काहींची कातडीच गेंड्याची असते तर काहींची नसते. काही जण त्यामुळे ह्या बाबतीत बेधडक वागू शकतात. मग मला हेही दिसून आले की काही जण डास सरळ सरळ जाऊन हातानेच टाळी देऊन मारतात. तेही मला करायचे नाहीये. आणि काही जण सरळ सरळ पेपर ची चापटी ठेऊन देऊ तेच कर्म करतात.

मग तीच गोष्ट हिट वगैरे वगैरे सारख्या स्प्रेज ची. पण ह्याच्यासाठीही फार प्लँनिंग  लागते. कारण झोपायच्या आधी काही तास मारून ठेवावे लागते. शिवाय पुन्हा तेच, फवारे आणि वास. आणि डास तरीही वाजत गाजत गुणगुणत हजर.

हां अजून एक passive मार्ग ही मी पत्करून बघितला तो म्हणजे, विनोदबुद्धी, जी माझी बऱ्यापैकी शाबूत आहे असे मला तरी वाटते. एकदा वाटले, ही गुनगुना रहे हैं भवर खिल रही है, ... . मग हे ही लक्षात आले की डास काही रोमँटिक भोवरा नाही, मीही शर्मिला नाही आणि मी कली कली ही नाही, किंवा असेन ही, आहे ही,  पण मी 'ती' नाही. :-)

हळूहळू मग एक अर्जुन म्हणून लक्षात यायला लागले की अखेर माझ्याकडे बॅट आहे. तशी तर मी क्रिकेटीअर पण नाही. पण मी क्रिकेट खेळले आहे स्वतःचे आणि आमच्या लहानपणच्या चाळीतल्या मित्र मैत्रिणींचे मिळून स्वतःच बनवलेले आणि लोकशाही तत्वावर आधारलेले रूल्स वापरून. आणि शिवाय हेही अचानक आठवले की मी V.J.T.I. मध्ये इंजिनीरिंग ला असताना जवळच फाईव्ह गार्डन्स मध्ये खेळल्या गेलेल्या वूमेन्स क्रिकेट match मध्ये भाग घेतला होता, आणि एक महत्वाची सिक्सर आणि एक महत्वाची विकेट मी घेतली होती. अर्थात सर्वच मुली छान खेळल्या आणि teamwork सुद्धा आणि आम्ही, as कॉम्पुटर इंजिनीरिंग टीम, जिंकलो ही. जिंकणे हरणे सोडा अर्थात, पण प्रश्न  आहे आपण कोणता मार्ग घेऊ शकतो.

आणि परत मूळ मुद्धा असा आहे की डासांचे काय? मी आता माझ्यातले विसरलेले क्रिकेटीअरत्व पुन्हा स्वतःत आणले आहे. पहिल्याच दिवशी मी वेगवेगळ्या शोधांचा चा आधार घेऊन मी माझे नवीन शस्त्र हाती घेतले आहे. थँक्स टू फाईव्ह गार्डन्स क्रिकेट ग्राउंड अँड टु चाईल्ड हूड टाइम्स क्रेझी क्रिकेट. आज मेरे पास मेरी बॅट है. समर्थ रामदासांनी म्हंटलेली एक ओळ आठवली: "मना सत्यसंकल्प जीवी धरावा". :-)




Saturday, January 12, 2019

स्वयंपाक न करणाऱ्यांचा स्वयंपाक

स्वयंपाक ह्या शब्दाची फोडच स्वयं आणि पाक म्हणजेच स्वतः केलेला पाक अशी होते :-) अर्थात 'स्वतः' केलेला (ले) पदार्थ. मग आता स्वयंपाक न करणाऱ्यांचा स्वयंपाक कसा काय असू शकतो? खर तर मग तो स्वयंपाकच नाही, अगदी शब्दशः बघायला गेलो तर. पण आजकालच्या सतत ऑर्डर ऑनलाइन च्या जमान्यात स्वयंपाक करायचाय  तरी कोणाला, घरी ते पण. हे झाले दोनही एक्सट्रीम्स.

स्वयंपाकात अतिशय तरबेज आणि सक्षम असलेले स्वयंपाकघरात कितीही (इन्फिनिटी माहित्ये ना?) वेळ घालवू शकतात. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा दमलेला आनंद बघूनही मला हे वारंवार पटते की ही एक कला आहे. पाककला. आणि त्यात नुसताच पाक नाही तर असंख्य गोष्टी केल्या जातात. आणि हेही पटते की "there is a lot to learn in this my yellow kitchen" :-) बरेचदा असेही दिसते की स्वयंपाक करणाऱ्यांना प्रत्यक्ष आपण केलेल्या जेवणाचा आस्वाद घ्यायलाही फुरसत नसते किंवा तेवढा उत्साह (राहिलेला) नसतो. अर्थात हे खूप कष्टाचे आणि जिकिरीचे काम आहे. जोखीम ही खूप. आणि हेही खरे की आडात असले तरच पोहऱ्यात येते.  :-) पुन्हा काळ काम वेग सगळे आलेच. खूप मोठे मॅनेजमेंट स्किल ही आहे ह्यात. आणि चांगल्या जेवणाचा आस्वाद घ्यायला सर्वांनाच आवडतो, त्यात दाद ही मिळाली तर ती ही सर्वांनाच हवी असते. ही झाली संख्यारेषेवरची एक बाजू.

दुसरी बाजू म्हणजे अर्थातच नेहेमीच झटपट ऑर्डर ऑनलाईन, मग डिलिव्हरी ला कितीही वेळ जाओ. कितीही थंडगार येवो. शिवाय त्यावर खर्च केलेले पैसे (खर तर डॉलर मध्येच मोजले पाहिजेत :-)) आणि त्यातून मिळालेली किंमत (value for money) हेही विचार करण्यासारखेच. त्यातून जर पिझ्झा मागवला तर त्यातील गम्मतच न्यारी कारण तो थोडाफार थंडगार आणि मग त्याचे तुकडे  करण्यात खर्च होणारी शक्ती आणि त्यातून (पिझ्झ्यातून) मिळणारी ऊर्जा ह्याचे तसे गणित ही चुकेलेलंच. असो, सर्वांना आवडतो तोचि खरा :-)

दोन  टोके, सतत ऑनलाईन फूड चे प्रेमी आणि सातत्याने, रोजमरह जिंदगी में, जातीचे स्वयंपाक बनवणारे ह्यांच्या मध्ये कुठेतरी असतात ते स्वयंपाक न करता स्वयंपाक करणारे. ह्यांना मुळापासून भाजीपाल्याची आवड आहे पण स्वयंपाकघरात  रमण्याची आवड नाही. हे लोक आपल्याला काम करता येत  असेल, नसेल तरी मदतीचा हात घेऊन काम करून घेऊ शकतात आणि तेही उत्तम प्रकारे! खाणे आणि बनवणे ह्यातली मेहेनत जाणतात, आणि इतर काही स्किल्स (स्वयंपाक करायला म्हणून येणाऱ्या  मदतनिसांना समजून  घेणं  , त्यांच्याकडून काम करूनघेणं, तयारी करून घेणं , मेनू चे नियोजन ठरवणं, सतत आत्ता आहोत त्याच्यापेक्षा सुधारण्याचा घ्यास ठेवणं, आरोग्यदायी जेवण बनवून घेणे, बॅकअप थोडेफार तयार ठेवणे, जेवण हे विनातक्रार आनंदी आणि प्रसन्न मनाने जेवणं ) च्या जोरावर  स्वयंपाक आणि स्वयंपाकघर ह्याची नाव तारून नेतात.

ह्यात खर तर दोन्ही टोकाचे तसे बघितले तर आपापल्या जागी "प्युरिस्ट". आणि त्यांना आपल्या कर्तबगारीबद्दल सार्थ अभिमानही असतो. पण 'स्वयंपाक न करणाऱ्यांचा स्वयंपाक' किंवा स्वयंपाक करून घेणारे वाले मात्र त्यामानाने स्वतःबद्दल अभिमान बाळगत असले/नसले तरी त्यांची फारशी दाखल घेतली जाताना दिसत नाही.  Afterall all these are different types of skills. 'सतत ऑर्डर फूड ऑनलाईन प्रेमी' आपल्याकडच्या ऑनलाईन स्किल्स बद्दल वृथा अभिमान बाळगतात आणि मुळा, पालक दुधी ह्यांना तुच्छ लेखतात. शिवाय मिळेल तेवढी किंमत मोजायची उर्मी (आणि कधीकधी गुर्मी ) त्यांच्यात असते. प्रश्न आहे तो मिड-कॅप फंडस् चा. त्यांना तसे कुठे फार स्थान नसते. संख्यारेषेवर ते मध्यभागी असते तरी ते शून्य तर नक्कीच नसतात तर, आपापल्या जागी उत्तम असतात.

अजून एक विचारप्रवाह  फिरताना दिसतो जो म्हणजे फक्त "प्युरिस्ट" च जेवणावर सगळ्यात जास्त प्रेम करतात. किंवा त्यातले थ्रिल  सगळ्यात जास्त अनुभवतात.

पण ह्यावरही माझे स्वतःचे असे मत आहे ते म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं,  तुमचं आमचं खरोखरच सेम असतं.  जेवण हा एक प्रवास आहे. त्या प्रवासावर प्रेम करणारे बहुतेक सगळेच आहेत. मिड कॅप्स ही आहेत जे आपला मार्ग सातत्याने जपतात. त्यांच्याकडे फार काही ऑनलाईन मधून येणारे  भुरळ घालणारे पॅकिंग नाही आहे. आणि त्यांच्याकडे 'स्वयंपाक' केलेला  स्वानंद ही नाही आहे.

पण ह्याचा अर्थ त्यांचं स्वयंपाक  करण्याच्या प्रवासातले प्रेम कमी आहे असे काहीच नसते. त्यांचे कलाक्षेत्र फक्त वेगळे असते. हा लेख अशा सर्व स्वयंपाक न करता स्वयंपाक करणाऱ्यांसाठी :-) अभिमानाने जगा :-)