Saturday, March 15, 2025

अश्रूंची झाली फुले

 काहीतरी कशातरी नव्याने परिवर्तित होणे हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. मला ह्या अशा वेगवेगळ्या ट्रान्सफॉर्मशन्स बद्दल फार आतमीयता आणि कुतूहल वाटत आले आहे. एखादी गोष्ट आधी वेगळ्या फॉर्म मध्ये असते मग नंतर ती आपोआप कालावकाश फॉर्म बदलते. अशा सगळ्या गोष्टींमध्ये एक अतिशय सुंदर आणि भावणारी गोष्ट म्हणजे अश्रूंची फुले होणे. खरे तर दोघांचा काही डायरेक्ट संबंध नाही. पण खूपश्या कविता आणि गोष्टींमध्ये अश्रूंची फुले होणे हे वाचनात येत गेले आहे. मग म्हणजे होते काय? 

अश्रू खरं तर जास्त करून दुःख व्यक्त करतात... काहीतरी साचलेले असते मनात हे अश्रूंच्या माध्यमातून बाहेर येते.. ते एक कारण बनते निमित्त मात्र. साचलेले काहीतरी वेगळेच असू शकते पण त्याच वेळी ते व्यक्त होणे देखील महत्वाचे असते. अश्रूंना जर धरण घालून खूप जास्त किंवा कृत्रिमरीत्या रोखून धरले तर तेही मनासाठी चांगले नसते. वाटले, रडले व्यक्त झाले पुढे गेलो इतक्या सहजतेने रडणे झाले तर तसेच हसणे ही होऊ शकते असे मला वाटते. मी असे कित्येकदा बघते की जे खूप प्रयत्नपूर्वक अश्रू बंदिस्त करून ठेवतात त्यांना नंतर नंतर अथवा हळूहळू हसणेही कठीण जायला लागते.. 

म्हणजेच भावनांना अध्याहृत धरू नये.. हसू आणि आसू कदाचित शेजारी शेजारीच राहात असतील? आणि अश्रू देखील कधी दुःखाचे कधी आनंदचे देखील असतातच की? ह्या सगळ्यात अश्रूंची झाले फुले हा एक मेटॅमॉर्फोसिस आहे. म्हणजेच ते सुरवंट जसे खूप स्टेप्स मधून मोठे होत अचानक एके दिवशी सुंदरसे फुलपाखरू बनून उडून जाते तसेच अश्रू देखील कधीतरी रडत रडत अचानक एके दिवस सुंदर से हास्य बनतात तर कधी एक सुंदर शी अभिव्यक्ती बनतात तर कधी एखादे सुंदर से गाणे बनतात तर अशी कोणतीही कलाकृती बनतात...आणि दरवेळीच कलाकृती कशाला हवी? कदाचित एखादी छोटीशी मोकळे पण दिलेली दाद बनतात.. ज्या ज्या गोष्टींमध्ये मोकळे पणा आहे, सौंदर्य आहे ते बनतात आणि त्यांनाच कदाचित फुले म्हणत असतील?? 

Wednesday, March 12, 2025

काटकसर हवीच पण कंजूषपणा नको

माझ्या शाळेत आल्याआल्या विंग मध्ये खूप छान छान सुविचार लिहिलेले असत. अगदी शाळेतल्या वर्गात सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याला रोज एक नवीन छान विचार उर्फ सुविचार लिहायला सांगितला जात असे. तेंव्हापासूनच हा रोज एक सुविचार मनावर लिहिला जात असे, खडूने. हे सगळे इतके ऑरगॅनिक होते, की अजूनही मी quotes च्या शोधात असते.. 

"काटकसर हवीच पण कंजूषपणा नको". हा एक त्यातलाच एक कोट.  घरीही ह्या कोट ला साजेसेच वातावरण होते. म्हणजे अगदी त्यातल्या त्यात काटकसरीकडे झुकणारे जास्तच. काटकसर होतीच, पैसे ही फारसे नव्हते, होते ते व्यवस्थित खर्च व्हायचे, वाचवत वाचवत, सगळेच जुळून यायचे. त्यात आम्ही ही आहे त्यात खुश होतो. साधी राहाणी हे मूळ तत्व उर्फ value foundation होते. मग काटकसरीची सुरवातच भाजी बाजारापासून व्हायची. आई किंवा बाबा भाजी माफक दरात मिळेल तिथून आणायचे मग त्या साठी थोडे जास्तीचे कष्ट घेतले तरी चालतील. किंवा खरं तर कष्ट हाच धर्म होता. तो आम्ही बघितला अनुभवला आणि कधी question करावासा वाटला नाही. शाळेतली, मित्र मैत्रिणींची, नातेवाइकांबरोबरची  सेलेब्रेशन्स देखील तशी साधीच असायची हो त्यातही काटकसर ला मूलभूत घटक किंवा अगदी आयुष्याचा 'महत्तम सामायिक घटक' उर्फ मसावि होता म्हंटलं तरी हरकत नाही. 

उन्हाळा  सुरु झाला कि शाळेत अगदी ह्या quote ला साजेसे सेलेब्रेशन व्हायचे. कैरीची डाळ, पन्हे आणि कलिंगड  'क प क' सेलेब्रेशन म्हंटले तरी चालेल. अगदी आजच्या काळातल्या A B C  ज्यूस सारखे. :)

मग पुन्हा एकदा त्या काळात डुबकी मारून हे बघावे म्हंटले तर वाटते की फक्त काटकसर च होती का? का कंजूषपणा देखील होता? तर नाही. घरी सगळे गोड  धोड पदार्थ बनायचे, विकत आणायचो.  कपड्यांची थोडी फार चैन होती,  प्रवासाची आवड असल्याने रिकरिंग अकाउंट चालू करून आई बाबा पैसे वाचवायचे आणि आम्ही जमेल तसे फिरतही असू . इन फॅक्ट मला प्रवासवर्णन लिहायची किंवा काहीतरी लिहायची आवड ह्या च काळात निर्माण झाली. म्हणलं तर सुट्टीत पिक्चर बघणे, नाटक बघणे गाण्याचे प्रोग्रॅम्स बघणे जास्त करून मूड्स ऑफ रफी हा, किंवा अगदी मराठीतला गीत रामायण देखील. कधी पुढचा रो कधी थोडा मागचा किती खर्च करायचा त्यावरून विचार केला जात ही असेल. पण आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वानंद शोधायला स्वातंत्य्र देखील मिळत असे. :) 

कधी वाटतं स्वानंदाची काही किंमत असते का? फार नसेल किंवा बिलियन डॉलर च्या ही पलीकडे असेल? एखादा फकीर आनंदी असतो तशी?  तर काहीही असो , आपण तो आपण मिळवला पाहिजे, आपल्या जवळच्यांना वाटला ही पाहिजे..खर तर..तेच होत ही असे! आनंद द्विगुणित किंवा त्रिगुणित होणे हे सगळे ह्यातून विनासायास घडत असे. 

आनंदाचा भागाकार होण्याची करणे देखील फारशी नव्हती. सो निखळ आनंद जास्त वाटत असे आणि तो पैशाने विकत घेता येत ही नसे :) 

म्हणजे पैसे महत्वाचे नाहीत का? होते तर. पण आहे ते थोडे फार  काटकसरीने राहून, पण कंजूषपणे न राहता जमून जात असे. 

ह्या सगळ्या ला आता अनेक पर्व  उलटली. अजूनही काही गोष्टी मूल्ये तशीच आहेत. बघितलं  तर आता काळाच्या ओघात पैसे ही आले, राहणीमान आले, luxuries आल्या. गाड्या आल्या , घोडे आले (ते नाही आले पण आपला असच लिहिला :)). गॅजेट्स आली. प्रवास आले. अजूनही चालू. सगळं सगळं च quantitatively वाढत गेलं , सुधारलं. काटकसर कमी झाली. कंजूषपणा नव्हताच पण कुठेतरी सगळ्या  मुल्यांचा मेळ जमेनासा झाला . म्हणजे वास्तविक पाहता मूल्ये तीच राहिल्येत. पण त्यांची आजच्या काळातली आकडेमोड थोडी गडबडली. आज खूप जणांकडे लॅव्हिश घरे आहेत, बऱ्याचशा मटेरिअलिस्टिक गोष्टी ही आहेत. काटकसर नावाचे ते नाटकातले पात्र कुठेतरी माळ्यावर निघून गेल्यासारखे वाटते. वारेमाप पैसे मोजले जातात एखाद्या इन्स्टंट आनंदा साठी, एखाद्या मोठ्या इव्हेंट साठी, किंवा असेच काहीतरी. हे सगळे आजूबाजूला चाललेले दिसते .. पण मला वाटतं हे सगळे transformation किंवा परिवर्तन आपण रोखू शकत नाही आणि रोखू ही नये. पण त्यावर घोड्यावर आरूढ होतो तसे आरूढ व्हावे. 

म्हणजे काय,..? तर कदाचित त्याच values आहेत..  एखाद्या वेळी एखाद्या गोष्टीतील खर्चाचा आवाका बघावा देखील पण बिनधास्त मग खर्च ही करावा. वस्तू मधून आनंद मिळत नसला तरी हेही अर्धसत्य आहे. आजच्या काळात लागणाऱ्या काही गोष्टींवर काळाची गरज म्हणून नक्कीच खर्च केला पाहिजे.  वोह जिंदगी ही क्या जिस में हम पैसे सिर्फ एक बक्से में राखे? या दिल कि सुनो दुनियावलो? दिल की आवाज भी सुन? .. काटकसर हवीच पण इतकीही नको की आपण पैसे असूनही ते खर्च कसे कशावर करावेत हेही विसरून जाऊ. म्हणतात ना penny wise pound foolish बानू.  किंवा पैसे असूनही अकबर  बादशाह सारखे वागूनही काय मजा त्यात? बूंद से गइ वोह फीर हौद से नही आती ? 

सगळ्यांनाच अकबरासारखा बिरबल भेटत नाही.. आपल्यालाच आपलेच बिरबल व्हावे लागेल. एक बिनधास्त दिलदार आयुष्य जगायला .. आणि तेही अगदी 'बुंदे' वालं नाही.. 'हौद' वालं ही नाही.. कुठेतरी त्यांच्या सीमा रेषेवर? व्हॉट से ?

Thursday, November 14, 2024

जीन्स चे वजन

असा कधी भन्नाट विचार तुमच्या मनात आला आहे का? कि जीन्स चे वजन करून बघू? किंवा गूगल सर्च करून बघू की, आपल्या (आपापल्या) जीन्स चे सरासरी वजन किती असते? खरं तर असले वेडे प्रकार कशाला? :)


डाएट व्यायाम आणि नुट्रीशन हे माझे आवडते टॉपिकस असले, आणि मी जरी ऋजुता दिवेकर चे व्हिडिओस आणि तिचे करीना कपूर बरोबरच्या मुलाखती बघितल्या असतील तरी देखील स्वतःचे च वजन करतो ना आपण? जीन्स चे वजन? 


तर असे आहे की नुकतेच मला दोन एक महिन्यानंतर वजन करण्याचा चान्स मिळाला. :) मी खुश झाले. डॉक्टर कडे गेले होते रेगुलर अल्ट्रासाऊंड टेस्ट्स साठी, म्हंटलं विचारुयात, वजन काटा आहे का. तर चक्क होता. :) दोन महिने गेले होते मध्ये म्हणूनच एक प्रकारची धडधड, किती असेल वजन? :) ह्याला म्हणतात speculation :) मधल्या कालावधीत दिवाळी येऊन गेली होती, माझा वाढदिवस मग वेगवेगळे गोड  पदार्थ खाणे आणि माझ्या रेफेरिंग डॉक्टर चा सल्ला न मानणे  वगैरे वगैरे. तरीही एक मन सांगत होतं की वजन तेवढेच असेल जेवढे लास्ट टाइम दोन महिन्यांपूर्वी केले. आणि हो मी थोडीच दर दिवशी वजन करते? तशी मी  एकदम नॉर्मल आहे. अधून मधून जाता येता वजन करावे, सारखे सारखे गरज नाही. असे माझे मत आहे. 


पण तरीही मी मनोमन घाबरले होते. आणि व्हायचे तेच झाले, वजन जास्त आले माझ्या अपेक्षेपेक्षा. एवढे रोज दोन दोन तास चालून देखील? एक मन डाफरलं माझ्यावर. दुसरं मन म्हणालं  की हे शक्यच नाहीये. आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या दुःखांचं  खरं  मूळ असतं  ते म्हणजे non-acceptance. मग आपण करणे शोधायला लागतो. आणि मग मला थोडा फार प्रश्नाच्या मुळापर्यंत गेल्यानंतर लक्षात हुशारीने लगेच लक्षात आला ते म्हणजे जीन्स चे वजन. :)


गूगल सर्च. प्रॉम्प्ट इंजिनीरिंग. लगेच मी मला हवी ती query बनवली. :) मला हवं  ते उत्तर मिळालं . की एका एव्हरेज जीन्स चे वजन सरासरी २ ते ३ किलो असतं. हलक्या म्हणजे चांगल्या  प्रतीची जीन्स असेल तर १ ते २ किलो. :) मग मी उत्तरांचा अवरेज काढला. २ किलो. माझ्या वजनातील त्रुटी मला लगेच कळली. :) 


मग मी खुश होऊन रेफेरिंग  डॉक्टर कडे गेले रिपोर्ट दाखवायला. तिचायकडे लागोपाठ करावं लागलं तरी वजन करणे सेरेमोनी होतोच तिथे. हे  मी विसरलेच  होते कि एका दिवसात एक दोन तासातच दोन ठिकाणी वजने होतील. मग मला वाटलं गुरुत्वाकर्षण. तिकडचे गुरुत्वाकर्षण आणि इकडचे ह्यात काही फरक असेल का? आणि हो मुंबई आणि पुणे ह्या दोन्ही ठिकाणचे गुरुत्वाकर्षण देखील वेगळे असू शकते. विज्ञान शिकल्याचे दुष्परिणाम. :) तर खैर, ही डॉक्टर तर माझी एकदम आवडती आहे. तिच्याकडे तर गेल्या ८ वर्षांचा माझा वजनाचा रेकॉर्ड ही असतो, ऋजुता दिवेकर कडे करीनाचा असेल तसा. नाही मला कोणत्याखी प्रकारे झीरो फिगर मेन्टेन करण्यात इंटरेस्ट नाहीये, ऑफ कोर्से. हम सिर्फ इतना चाहते हैं  के हम अपनी  मेंटल फिसिकल हेलथ का ठीक से खयाल रखे. 


तर मला ह्या माझ्या आवडत्या डॉक्टर ने डायरेक्ट तिचा ८ वर्षांचा डेटा ऍनालीटीकस दाखवल्यावर मी मान्य केलं  स्वतःशी. Acceptance ! जीन्स चे वजन इस नॉट द कलप्रिट. आय एम रिस्पॉन्सिबल :)


ह्यापुढे ही असे आणि असंख्य वेडे विचार मनात येतील, पण माझा एकच सल्ला असेल (विचारला नाही तरी), जीन्स चे वजन करायला जाऊ नका. GPT वापरायचाच असेल तर जास्त सत्कारणी लागेल अशा ठिकाणी वापरा :)

Tuesday, November 12, 2024

एक बार वक्त से लम्हा गिरा कही

काही गाणी आपल्या रोमारोमात किती भिनलेली असतातत ना? तसेच हे गुलझार चे 'आनेवाले पल जानेवाला है'. मूवी तर धमाल च होती -गोल माल. खरोखरच गोल माल आणि खूप सारे गोंधळ त्यातून निर्माण झालेले नाट्य त्यात अमोल पालेकर चा डबल रोल. तरीही मुव्ही कदाचित मी परत परत बघणार नाही, हे गाणे मात्र परत परत ऐकेन त्यातल्या अर्थावर विचार करेन, आणि तसेच जगायचं देखील कदाचित प्रयत्न ही करेन. 

त्यातलीच एक लाईन. एक बार वक्त से लम्हा गिरा कही... वहा दास्तान मिली .. ह्यातले अतिशय सुंदर मर्म म्हणजे, वक्त आणि लम्हा ह्यातला मेळ. वक्त म्हणजे अनादी अनंत असा 'मैं  समय हुन'. महाभारतातला धीरगंभीर आवाज.. सिरीयल सुरूच ह्या वाक्याने व्हायची. म्हणजेच मॅथेमॅटिकस च्या भाषेत इंफायनाईट टाइमलाईन. जिला सुरवात नाही जिला शेवट नाही. नाव आहे चाललेली काल ही अन आज ही.. 

हा सगळं वक्त चा स्पॅन ..त्यातनं एक लम्हा म्हणजे नक्की काय ? तर एक छोटासा बिंदू.. तोच लमहा जेंव्हा टाइमलाईन पासून निखळून पडतो.. तेंव्हा मागे वळून माघितलं त्या जागी काय मिळतं? तर लम्हा काही नही. तिकडे फक्त एक दास्तां उर्फ कहानी, एक वर्णन मिळतं ..एक स्टोरी मिळते.. आपल्याला हवी  तशी बनवलेली. पण ती तो मोमेन्ट म्हणून कधीच परत येत नाही. चांगला असो वा  वाईट वा त्यातला मधलाच काहीतरी. neutral. 

पण मग सगळं खेळ हा 'पल दो पल' का आहे .. आनेवाला पल..भी.. जानेवाला है.. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो ...पल ये जो जानेवाला है.. तेही गुलझार म्हणतोय की हो साके तो..पण का आग्रह धरत नाहीये? कारण अट्टाहास केला तरी तो लम्हा अजून निसटून जाऊ शकतो.. दास्तां बनत बनत..

मग त्या एका छोट्याशा इवल्याशा क्षणांमध्ये आपण आपल्याला झोकून देऊ शकतो का? हो सके तो? 

Monday, November 11, 2024

माझी बर्ट्रांड रसेल म्युसेली

हे काय? बर्ट्रांड रसेल म्युसेली ? बर्ट्रांड रसेल हा तर ब्रिटिश फिलॉसॉफर होऊन गेला ना ? मग त्याचा म्युसेली शी काय संबंध? संबंध असा की बर्षर आणि बर्ट्रांड ह्यांच्या उच्चरातले साम्य. खरं तर ह्या रेसिपी चे नाव आहे बर्षर म्युसेली! माझी अतिशय आवडती ब्रेकफास्ट डिश. पहिल्यांदा मी आणि माझा नवरा आम्ही  ऑस्ट्रेलिया त असताना खाल्ली. मस्त बनवली होती त्या होमस्टे च्या ओनर ने. त्यानंतर असेच कित्येक वर्ष कुठे काही ट्रॅव्हल असेल तर ही डिश मी आवर्जून घेत असे हॉटेल मधल्या ब्रेकफास्ट मध्ये. म्हणजे अगदी उडी मारून घेत असेल असं म्हंटलं तरी चालेल. 

माझे खाद्यपदार्थांमधले रिव्हर्स इंजिनीरिंग तेंव्हा एवढे जागरूक नव्हते. म्हणजे मी फार विचार करत नसे, खायला मिळालं आहे ना, त्याची कृतज्ञता व्यक्त करून मी खात असे. म्हणजे बेताने च हं, हावरटासारखे नाही, पण मन लावून वगैरे. 

कमिंग बॅक तो म्युसेली, एकतर नावच एवढे कठीण आहे उच्चारायला. त्यात बर्षर म्युसेली. आपली मराठी नावे बघा, उपमा, पोहे. छोटे छोटे साधे शब्द. हे बर्ट्रांड रसेल सारख्या तज्ज्ञ लोकांमुळे किंवा बर्षर म्युसेली सारखी कठीण कठीण नावे ठेवणाऱ्या अज्ञात माणसांमुळे सोप्या गोष्टी कठीण होतात. नाही का?

पण मी ठरवलं बर्षर म्युसेली बनवायचीच, जेंव्हा माझ्या नुकत्याच केलेल्या बोर्निओ ट्रिप मध्ये मला खूप ठिकाणी ही डिश खायला मिळाली. एक नवीन मत्रीण झाली ट्रिप मध्ये, ती  म्हणाली मी ही रोज करते. मी भितीयुक्त आदराने तिच्याकडे बघितले. ती म्हणाली ही 'नॉन-कूकिंग' रेसिपी आहे. मला अजूनच गोंधळायला झाले. म्हंटलं सांग पुढे. व्हर्जिन अँपल ज्युस घायचा, रोल्ड ओट्स घ्यायचे मग ते रात्री १० तास अँपल ज्युस मध्ये भिजवायचे मग त्यात योगर्ट, वगैरे वगैरे... मला चक्कर यायला लागली. एक एक त्यातला इन्ग्रेडियंट खास कुठून कुठून आणायचा होता. साधा सुद्धा नव्हता. मग मीही ठरवले, बीइंग डाय हार्ड ऑप्टिमिस्ट,  आता मी माघार घेऊच शकत नाही. बर्ट्रांड रसेल म्युसेली बनवायचीच. कितीही कठीण असली तरी. 

मग जंग जंग पछाडत, मग रोलिंग स्टोन सारखे गोल उड्या मारत म्हंटले तरी चालेल, कोणी  रोल्ड ओट्स देता का रोल्ड ओट्स असे विचारात दुकानं च्या दुकानं फिरले. काही दुकानदार तर माझ्याकडे कोहिनूर हिरा आहे का विचारल्या सारख्या अविर्भावात बघत आश्चर्यचकित झालेले दिसले. मग काहींनी नॉन रोल्ड ओट्स दिले. जे मी नाकारले. मग finally होकारले सुद्धा कारण म्हणजे बघुयात तरी. तेही गणित चुकले. मग एका शुभ मुहूर्तावर मला रोल्ड ओट्स मिळाले. भिजवलं एकदाचं  त्यांना. मधल्या वेळात मग व्हर्जिन अँपल ज्युस शोधला. तोही कठीणच होता मिळायला. :) मग तिने मला सांगितले बॉक्स वर काय बघायचे मग ऑथेंटिक व्हर्जिन अँपल ज्युस मिळतो. तोपर्यंत मग कसे बसे एक्सपायरी डेट न गेलेले योगर्ट मिळवले. असे करत करत मी ही जे के रोलिंग सारखी हॅरी पोट्टर ची लेखिका ऑलमोस्ट झाले. जे के रोलिंग सारखेच माझ्याकडेही कॉन्ट्रॅक्ट नव्हते तेंव्हा हातात. :)

आता फक्त राहिले ते एक शेवटचे काम ते म्हणजे हे सगळे नीट पणे मिक्स करणे. त्यात खजूर आणि काही फळे तुकडे करून घातले. . जमली बाबा एकदाची- बर्षर म्युसेली. आयुष्याबद्दल खूप काही शिकवून गेली मला ही रेसिपी. :) हुश्श्य . पण आतापर्यंत माझ्यातली मिनिमलिस्ट आता जागी झाली होती. इनफ इस इनफ. 

हीच रेसिपी आपण सोपी करू शकतो का? मग मी धडाधड त्यातले सोप्पे मार्ग शोधले, बाहेरून गोष्टी न आणता घरच्या घरी आपण कसे सगळे बनवू शकतो, तीच टेस्ट आणून? सगळे आत्मसात केले मग मला finally चांगली झोप लागली. शिवाय रोल्ड ओट्स १० तास भिजवून ठेवावे लागत नाही ह्याचा ही मूलभूत रिसर्च मी केला. त्याचा soaking time ३० मिनिटांवर आणून मी प्रोसेस ऑप्टिमाइझ सुद्धा केली. :) मी आता होममेड बर्षर म्युसेली  एक्स्पर्ट झाले आहे. झोपेतही पेपर घाला. मी पास होईन. :) आणि हो बर्ट्रांड रसेल फिलॉसफया सारखी ती  कठीण राहिली नाही, नाऊ आय प्रौडली से  आय कॅन मेक बर्षर म्युसेली :) 

Sunday, November 10, 2024

नर तुम झुठे जनम गवाया

 मध्यंतरी एक संत कबीर यांचा दोहा ऐकलं 'नर तुम झुठे'  जनम  गवाया झुठे का कोई अंत न पाया'. त्या गाण्याची चाल सुद्धा सुंदर लावली होती. एक प्रकारचे मुसिकल पण त्यातून काहीतरी philosophical. कधीकधी किंवा बऱ्याचदा डायरेक्ट ना सांगता एखाद्या माध्यमातून सांगितले गेले तर ते जास्त चांगल्या रीतीने मनामध्ये पोचते, नाही का? उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीतून किंवा संगीतातून किंवा किंवा एखाद्या रोल प्ले मधून. तर हे अशा असंख्य गाण्यांपैकी एक गाणे जे मनाला भिडले त्याचा अर्थ चाल आणि त्यातील उत्कटता ह्या सगळ्यामुळे. ह्यांनी जे गाणे मला इंट्रोड्युस केले त्यांनी आधीच सांगितले होते ह्या झूम कॉल मध्ये (म्हणजे ग्रुप वर) कि हे गाणे झेपायला थोडे कठीण आहे. तर बी रेडी फॉर हार्ष ट्रुथस. 

कबीर के उत्तर भारतातील एक संत कवी होऊन गेले. त्यांनी अशीच जात येता गाणी रचली ह्यात लोकांना अर्थ काळात गेला. जसे महाराष्ट्रातील संत कवी तुकाराम होते. नर तुम  झुठे मध्ये कव्हर म्हणाले की सगळेच म्हणजे नॉट जस्ट मेन बट एनी ह्यूमन बीइंग, माणूस हा प्राणी एकंदरीत च खूप खोटे आयुष्य जगतो. म्हणजे खरा तर उभा जन्म खोट्या मध्ये राहतो, illusion अथवा भासामध्ये की हेच खरे आहे. हा खोटेपणा इतका माणसात भिनत जातो की त्याला अंत राहत नाही... एक खोटा दुसऱ्या खोट्याकडे जातो, खोटे खोटे खातो, खोटे खोटे समाजात वावरतो एक मुखवटा पांघरून , इतकेच नाही तर अगदी जवळच्या नाते  संबंधांमधून सुद्धा तो खोटे पणाचे लेअर घालून शिताफीने वागतो.. कळत नकळत , मग खोटा दुल्हा खोटी दुल्हन मग खोटा संसार ह्या सगळ्यात रमून जात बालके सुद्धा खोटी म्हणूनच अशीच वाढतात वागतात .. हे मर्म .. 

हे सगळे ऐकायला ही धक्कास्पद वाटत जाते आपल्याला.. अरे आपण तर खोटे नाही आहोत, आपण खरे बोलतो मग काही जण आपल्याला खरे खुरे खोटे बोलत असतात हे ही आपल्याला माहित असतं .. पण आपण तरी खरे असतोच असतो .. मग हे सगळे चालले काय आहे? आखा जमा खोटा आणि व्यर्थ घालवतो माणूस हे असे कबीर का म्हणत आहेत किंवा असतील?

मग एक गम्मत शीर पणे हे सगळे कोडे शेवटच्या ओळींमध्ये सॉल्व्ह होते. ते म्हणजे शेवटच्या लाईन मध्ये ते म्हणतात , मी खरा खरा सांगतो की जो  स्वतःमध्ये सामावून जातो किंवा गेलेला असतो (म्हणजे स्वार्थी नव्हे), तो खरे खुरे जगतो. स्वतः शी  'touch' मध्ये असतो, जो (किंवा जी) स्वतः मध्ये growth शोधतो, आणि ते करता करता जगतो सगळ्यांबरोबर अर्थात.. तो खरा जगतो. म्हणजे जो 'अपने में ही समाया' असतो तो खरा जगण्याच्या जवळ जाऊ शकतो.. 

आता जे मी आधी म्हंटल्याप्रमाणे खरंच कठीण आहे. पचवायला किंवा डायजेस्ट करायला. पण तरीही कबीर म्हणतात कि हेच सत्य आहे हेच सांचे आहे. आता हे सगळे साधे सुधे पण भेदक सत्य समोर आणणे एका खूप सुंदर गाण्यातून ह्या दोन्ही प्रख्यात गायिकांनी (रंजनी आणि गायत्री)  म्हंटले आहे. थोडे क्लासिकल आहे पण मला मुसिकल म्हणून मला आवडत गेले आणि त्यातले 'झुठे' मधली गम्मत कळली तर आपल्यालाही नक्कीच काहीतरी नवा अर्थ सापडेल..

माझा भाऊ musician आहे, आम्ही मुसिक कंम्पोसिशन्स बद्दल बोलताना  एक मला तो म्हणाला, जे  मला पटले आणि आवडले, ते म्हणजे मुसिक म्हणजे विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे असतात. एखादा प्रश्न मग थोडे उत्तर मग हीच शृंखला.. धिस  इस मुसिक..धिस  इस लाईफ टू देन ?

Saturday, November 9, 2024

तुम्हाला काय व्हायचंय?

कोणाच्याही स्वयंपाकघरात घुसून एखादी गोष्ट शोधणे किंवा त्याही पलीकडे जाऊन एखादी गोष्ट किंवा आयटम बनवणे ही एक अत्यंत कठीण कला आहे असे मला वाटते. शिवाय अत्यंत आत्मविश्वास ही लागतो त्याला. जो माझ्यात नाही आहे असे म्हंटले तरी चालेल अथवा मला माझा  आत्मविश्वास इतर जागी वापरायला जास्त आवडतो. उदाहरणार्थ कामात. 

ह्याचा अर्थ मला कोणाच्या ही किचन मध्ये जायला जमतच नाही असे नाही पण गम्मत अशी आहे की, उदाहरणार्थ माझी आई फ्रिज टॉप टू  बॉटम नियोजित करत  असेल तर मी बॉटम टु टॉप. मी जर भाज्या फ्रिज च्या खालच्या कप्प्यात ठेवत असें तर आई वरच्या. मी जर गोष्टी  झाकून ठेवत असें फ्रिज मध्ये तर आई उघडे. कोणी चमचे उलटे ठेवत असेल तर कोणी सुलटे. 

सगळ्यात जास्त धाडसी गोष्ट म्हणजे कोणाच्याही फोडणीच्या भांडत बघणे. (including mine). कोणाचे फोडणीचे भांडे गबाळे तर कोणाचे अजून गबाळे. कोणाचे कमीत कमी लेव्हल ला सगळे मसाले आलेले तर कोणी ओतप्रोत भरून एकमेकांच्या लाईन ऑफ कंट्रोल मध्ये घुसणारे. 

एक ना धड भराभर चिंध्या. तर अशा विविध पद्धतीने नटलेली असंख्य किचन्स. मग तुम्ही म्हणाल कि कशाला वेळ येत्ये असे अचानक किचन मध्ये जाऊन कोणाकडेही धुंडाळायला? हल्ली तसे बघितले तर कमी च येते अशी वेळ पण तरीही जेंव्हा येते तेंव्हा मी बघितले आहे कि काही जण किचन फिगर आउटिंग गरुडासारखे फार कमी वेळात आणि शिताफीने करू शकतात तरी काही जण स्लॉथ असतात. 

मग तुम्हाला काय व्हायचंय? पूल देशपांडेंना सारखा एक प्रश्न विचारते. स्लॉथ का इगल? :)