Saturday, March 2, 2019

माझे डास-युद्ध

तसे मी स्वतःला अजातशत्रू मानते. माझे कोणाशी वैर नाही आणि माझ्याशीही कोणी वैर धरू नये. जे माणसांबद्दल तेच कीटकांबद्दल ही. आता छोट्या छोट्या मुंग्याच बघा उगाच पाय पडून मरु  नयेत ह्याची जमेल तेवढी काळजी घेणे, जास्त करून काळ्या मुंग्या.  काळ्या मुंग्या हे देवाचे स्वरूपच अशी एक (अंध?) श्रद्धा मी लहानपणी ऐकली होती.  त्याउलट लाल मुंग्यांना मारावेत हे अप्रत्यक्ष सिद्धतेप्रमाणाणे येतेच, त्या करकचून चावतात म्हणून. ह्या वेळी विश्वरूपदर्शन पटकन समोर येते..

असो, आता प्रश्न डासांचा आहे. आणि एकंदरीत लक्षात आले आहे मला की डासांची मजल आता ७ व्या  मजल्यापर्यंत नक्कीच पोचली आहे. त्यांनाही टेकनोलॉजि कळते आता. उगाच अंग मेहेनत करून ते आता उडत उडत येत नाहीत, मस्त पैकी लिफ्ट मधून येतात. मग हाय काय आणि न्ह्याय काय, कितवाही का मजला असेनात. तसे मी बॅगेतून ओडोमास घेऊन बागेत फिरत असतेच. हा एक passive मार्ग झाला. मग आजकालचे सगळे डासांमार्फत फिरणारे आजार बघता, इतर passive खबरदारी घेणे ही भाग पडतेच. त्या शिवाय गुड नाईट,  ऑल आउट सारखे दिशाभूल करणारी प्रॉडक्ट्स ही आहेतच की आपल्या साथीला. त्यांचा ही उपयोग फक्त मनःस्वास्थ्यासाठी होतो पण, डासस्वास्थ्यासाठी होत नाही, हेही कळून चुकले. उगाच म्हणे गुड नाईट. आणि त्यात 'ऑल आउट' ?

मग आडवळणाने जाऊन मी इतरही काही गोष्टी केल्या. उदाहरणार्थ, डासांसाठी बनवलेल्या अशा उदबत्त्या आणल्या नुकत्याच केलेल्या एका ट्रिप मधून. तीही लावली. . पण हाही तास passive mode च, डास repellant. ह्याव्यतिरिक्त ओडोमास पेक्षाही पॉवरफुल अशी इतर काही प्रॉडक्ट्स ही कळली, नुसतेच ३ डॉट्स ड्रेस ला लावायचे. की मग डास गायब. त्यांचाही फीडबॅक सो सो च.

मग मी ह्या विषयात अजून खोलात शिरायचे ठरवले. खोलात जाऊन कधीकधी निरर्थक शोध नावायची मला सवय आहेच. असेही लक्षात आले की काहींना डास चावतात तर काहींना नाही. मेरी मर्जी. मैं चाहे येह करूं मैं चाहे वोह करूं. काहींची कातडीच गेंड्याची असते तर काहींची नसते. काही जण त्यामुळे ह्या बाबतीत बेधडक वागू शकतात. मग मला हेही दिसून आले की काही जण डास सरळ सरळ जाऊन हातानेच टाळी देऊन मारतात. तेही मला करायचे नाहीये. आणि काही जण सरळ सरळ पेपर ची चापटी ठेऊन देऊ तेच कर्म करतात.

मग तीच गोष्ट हिट वगैरे वगैरे सारख्या स्प्रेज ची. पण ह्याच्यासाठीही फार प्लँनिंग  लागते. कारण झोपायच्या आधी काही तास मारून ठेवावे लागते. शिवाय पुन्हा तेच, फवारे आणि वास. आणि डास तरीही वाजत गाजत गुणगुणत हजर.

हां अजून एक passive मार्ग ही मी पत्करून बघितला तो म्हणजे, विनोदबुद्धी, जी माझी बऱ्यापैकी शाबूत आहे असे मला तरी वाटते. एकदा वाटले, ही गुनगुना रहे हैं भवर खिल रही है, ... . मग हे ही लक्षात आले की डास काही रोमँटिक भोवरा नाही, मीही शर्मिला नाही आणि मी कली कली ही नाही, किंवा असेन ही, आहे ही,  पण मी 'ती' नाही. :-)

हळूहळू मग एक अर्जुन म्हणून लक्षात यायला लागले की अखेर माझ्याकडे बॅट आहे. तशी तर मी क्रिकेटीअर पण नाही. पण मी क्रिकेट खेळले आहे स्वतःचे आणि आमच्या लहानपणच्या चाळीतल्या मित्र मैत्रिणींचे मिळून स्वतःच बनवलेले आणि लोकशाही तत्वावर आधारलेले रूल्स वापरून. आणि शिवाय हेही अचानक आठवले की मी V.J.T.I. मध्ये इंजिनीरिंग ला असताना जवळच फाईव्ह गार्डन्स मध्ये खेळल्या गेलेल्या वूमेन्स क्रिकेट match मध्ये भाग घेतला होता, आणि एक महत्वाची सिक्सर आणि एक महत्वाची विकेट मी घेतली होती. अर्थात सर्वच मुली छान खेळल्या आणि teamwork सुद्धा आणि आम्ही, as कॉम्पुटर इंजिनीरिंग टीम, जिंकलो ही. जिंकणे हरणे सोडा अर्थात, पण प्रश्न  आहे आपण कोणता मार्ग घेऊ शकतो.

आणि परत मूळ मुद्धा असा आहे की डासांचे काय? मी आता माझ्यातले विसरलेले क्रिकेटीअरत्व पुन्हा स्वतःत आणले आहे. पहिल्याच दिवशी मी वेगवेगळ्या शोधांचा चा आधार घेऊन मी माझे नवीन शस्त्र हाती घेतले आहे. थँक्स टू फाईव्ह गार्डन्स क्रिकेट ग्राउंड अँड टु चाईल्ड हूड टाइम्स क्रेझी क्रिकेट. आज मेरे पास मेरी बॅट है. समर्थ रामदासांनी म्हंटलेली एक ओळ आठवली: "मना सत्यसंकल्प जीवी धरावा". :-)




Saturday, January 12, 2019

स्वयंपाक न करणाऱ्यांचा स्वयंपाक

स्वयंपाक ह्या शब्दाची फोडच स्वयं आणि पाक म्हणजेच स्वतः केलेला पाक अशी होते :-) अर्थात 'स्वतः' केलेला (ले) पदार्थ. मग आता स्वयंपाक न करणाऱ्यांचा स्वयंपाक कसा काय असू शकतो? खर तर मग तो स्वयंपाकच नाही, अगदी शब्दशः बघायला गेलो तर. पण आजकालच्या सतत ऑर्डर ऑनलाइन च्या जमान्यात स्वयंपाक करायचाय  तरी कोणाला, घरी ते पण. हे झाले दोनही एक्सट्रीम्स.

स्वयंपाकात अतिशय तरबेज आणि सक्षम असलेले स्वयंपाकघरात कितीही (इन्फिनिटी माहित्ये ना?) वेळ घालवू शकतात. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा दमलेला आनंद बघूनही मला हे वारंवार पटते की ही एक कला आहे. पाककला. आणि त्यात नुसताच पाक नाही तर असंख्य गोष्टी केल्या जातात. आणि हेही पटते की "there is a lot to learn in this my yellow kitchen" :-) बरेचदा असेही दिसते की स्वयंपाक करणाऱ्यांना प्रत्यक्ष आपण केलेल्या जेवणाचा आस्वाद घ्यायलाही फुरसत नसते किंवा तेवढा उत्साह (राहिलेला) नसतो. अर्थात हे खूप कष्टाचे आणि जिकिरीचे काम आहे. जोखीम ही खूप. आणि हेही खरे की आडात असले तरच पोहऱ्यात येते.  :-) पुन्हा काळ काम वेग सगळे आलेच. खूप मोठे मॅनेजमेंट स्किल ही आहे ह्यात. आणि चांगल्या जेवणाचा आस्वाद घ्यायला सर्वांनाच आवडतो, त्यात दाद ही मिळाली तर ती ही सर्वांनाच हवी असते. ही झाली संख्यारेषेवरची एक बाजू.

दुसरी बाजू म्हणजे अर्थातच नेहेमीच झटपट ऑर्डर ऑनलाईन, मग डिलिव्हरी ला कितीही वेळ जाओ. कितीही थंडगार येवो. शिवाय त्यावर खर्च केलेले पैसे (खर तर डॉलर मध्येच मोजले पाहिजेत :-)) आणि त्यातून मिळालेली किंमत (value for money) हेही विचार करण्यासारखेच. त्यातून जर पिझ्झा मागवला तर त्यातील गम्मतच न्यारी कारण तो थोडाफार थंडगार आणि मग त्याचे तुकडे  करण्यात खर्च होणारी शक्ती आणि त्यातून (पिझ्झ्यातून) मिळणारी ऊर्जा ह्याचे तसे गणित ही चुकेलेलंच. असो, सर्वांना आवडतो तोचि खरा :-)

दोन  टोके, सतत ऑनलाईन फूड चे प्रेमी आणि सातत्याने, रोजमरह जिंदगी में, जातीचे स्वयंपाक बनवणारे ह्यांच्या मध्ये कुठेतरी असतात ते स्वयंपाक न करता स्वयंपाक करणारे. ह्यांना मुळापासून भाजीपाल्याची आवड आहे पण स्वयंपाकघरात  रमण्याची आवड नाही. हे लोक आपल्याला काम करता येत  असेल, नसेल तरी मदतीचा हात घेऊन काम करून घेऊ शकतात आणि तेही उत्तम प्रकारे! खाणे आणि बनवणे ह्यातली मेहेनत जाणतात, आणि इतर काही स्किल्स (स्वयंपाक करायला म्हणून येणाऱ्या  मदतनिसांना समजून  घेणं  , त्यांच्याकडून काम करूनघेणं, तयारी करून घेणं , मेनू चे नियोजन ठरवणं, सतत आत्ता आहोत त्याच्यापेक्षा सुधारण्याचा घ्यास ठेवणं, आरोग्यदायी जेवण बनवून घेणे, बॅकअप थोडेफार तयार ठेवणे, जेवण हे विनातक्रार आनंदी आणि प्रसन्न मनाने जेवणं ) च्या जोरावर  स्वयंपाक आणि स्वयंपाकघर ह्याची नाव तारून नेतात.

ह्यात खर तर दोन्ही टोकाचे तसे बघितले तर आपापल्या जागी "प्युरिस्ट". आणि त्यांना आपल्या कर्तबगारीबद्दल सार्थ अभिमानही असतो. पण 'स्वयंपाक न करणाऱ्यांचा स्वयंपाक' किंवा स्वयंपाक करून घेणारे वाले मात्र त्यामानाने स्वतःबद्दल अभिमान बाळगत असले/नसले तरी त्यांची फारशी दाखल घेतली जाताना दिसत नाही.  Afterall all these are different types of skills. 'सतत ऑर्डर फूड ऑनलाईन प्रेमी' आपल्याकडच्या ऑनलाईन स्किल्स बद्दल वृथा अभिमान बाळगतात आणि मुळा, पालक दुधी ह्यांना तुच्छ लेखतात. शिवाय मिळेल तेवढी किंमत मोजायची उर्मी (आणि कधीकधी गुर्मी ) त्यांच्यात असते. प्रश्न आहे तो मिड-कॅप फंडस् चा. त्यांना तसे कुठे फार स्थान नसते. संख्यारेषेवर ते मध्यभागी असते तरी ते शून्य तर नक्कीच नसतात तर, आपापल्या जागी उत्तम असतात.

अजून एक विचारप्रवाह  फिरताना दिसतो जो म्हणजे फक्त "प्युरिस्ट" च जेवणावर सगळ्यात जास्त प्रेम करतात. किंवा त्यातले थ्रिल  सगळ्यात जास्त अनुभवतात.

पण ह्यावरही माझे स्वतःचे असे मत आहे ते म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं,  तुमचं आमचं खरोखरच सेम असतं.  जेवण हा एक प्रवास आहे. त्या प्रवासावर प्रेम करणारे बहुतेक सगळेच आहेत. मिड कॅप्स ही आहेत जे आपला मार्ग सातत्याने जपतात. त्यांच्याकडे फार काही ऑनलाईन मधून येणारे  भुरळ घालणारे पॅकिंग नाही आहे. आणि त्यांच्याकडे 'स्वयंपाक' केलेला  स्वानंद ही नाही आहे.

पण ह्याचा अर्थ त्यांचं स्वयंपाक  करण्याच्या प्रवासातले प्रेम कमी आहे असे काहीच नसते. त्यांचे कलाक्षेत्र फक्त वेगळे असते. हा लेख अशा सर्व स्वयंपाक न करता स्वयंपाक करणाऱ्यांसाठी :-) अभिमानाने जगा :-)



Sunday, December 9, 2018

वेअर युअर ओन मास्क फर्स्ट

डीअर झिंदगी ही मुव्ही खूप जणांना आवडून गेली. शाहरुख, मला कधीकधी (च) आवडतो त्यातलीच ही एक. :-) पण हा लेख मूव्ही परीक्षणाचा नाही. एक गोष्ट मला नेहेमीच वाटत राहाते की आपण शरीराच्या कुरबुरींसाठी डॉक्टर कडे जातो तशाच मनाच्या साठी का नाही जात? माझा अटलांटा त असताना एक ऑफिस मेट होता जर्मन ओरिजीन असलेला. त्यावेळीही म्हणजे २००१ साली, तो कामाला आल्यावर गुड मॉर्निंग बरोबरच कधीकधी असेही म्हणायचा की मी आज माझ्या psychiatrist कडे जाऊन आलो. अपॉइंटमेंट होती वगैरे वगैरे. कशासाठी नक्की ते मी अर्थात कधी विचारले नाही आणि त्याची गरज ही वाटली नाही. असेल काहीतरी. पण तरीही मला त्यातल्या ओपेननेस चे आश्चर्य वाटले. जॉब व्यवस्थित टिकवून होता, कामात छान. आणि गम्मत म्हणजे कामाच्या ठिकाणी येऊन ही तो हे आरामात कसे सांगतो असे प्रश्न मला पडायचे. जॉब जाण्याची किंवा त्यावर काही निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल अशी भीती नाही का वाटत त्याला? असो तर भीती नक्कीच नव्हती . आणि 'लोग क्या कहेंगे' ह्याच्या विचार तिथे एवढा अवाजवी केला जात नाही, जेवढा बॅक-होम - भारतात केला जातो किंवा भारतीयांमध्ये केला जातो. अर्थात खूप वर्षांनंतर आता भारतातही किंवा रादर जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी राहत असेल्या भारतीयांमध्ये ही, ह्या विषयी जागरूकता आलेली आहे. आणि मला वाटते की हा एक चांगला बदल आहे. 

आता ह्यात सुद्धा खूप वेगवेगळे मतप्रवाह आहेत अर्थात. एक थिअरी असे म्हणते की जो "पेशंट" म्हणून आला आहे त्याचे "सिम्प्टोम्स" विचारुन त्याचा रूटकॉज शोधा, अर्थात प्रश्न विचारून आणि मग त्यावरून ठरवा की काही "माईंड टूल्स" देऊन (जी मानसोपचारतज्ज्ञांनी अभ्यास करून ठरवलेली आहेत आणि प्रॉव्हन आहेत) "पेशंट" ला काही सेशन्स मध्ये नॉर्मलसी ला कसे आणता येईल ते. असे छोटे खानी रिपेअर काम करून मदत नाही झाली तर मग कधी कधी ते काही औषधे देऊन मग बरे करावे लागते. अर्थात त्यापलीकडे  मानसोपचार म्हणून मला फार माहित नाही. पण एकंदरीत प्लॅन ऑफ ऍक्शन असा असतो. पण ह्यात मग कित्येकदा किंवा खूपदा, "पेशंट" ची काही गोष्टींमधून बाहेर पडायची, स्वतःची तळमळ खूप महत्वाची ठरते, आणि शिवाय कुटुंबीय आणि मित्रपरिवार, जो ही एक कुटुंबच आहे, ह्यांचा आधारही खूप महत्वाचा ठरतो. पण तरीही अगदी सगळ्यात महत्वाचे ठरते ते म्हणजे "पेशंट", किंवा खरं तर "ती व्यक्ती" , आणि तिचा किंवा त्याचा ह्या सगळ्यातला सहभाग. कारण जो बदल व्हायला हवा आहे तो त्या व्यक्तीला सगळ्यात जास्त व्हायला हवा असायला हवा असतो. 

प्रत्येक मनाला तसं बघायला गेलो तर मानसोपचारतज्ञाच्या MRI मधून स्कॅन केले तर काहीतरी सुधारणा घडवून आणण्यासारखे सापडेलच. तसं म्हंटलं तर गरज सगळ्याच प्रकारच्या मदतीची असते आणि म्हंटलं तर कशाचीच नसते. असेही प्रश्न येयात की खरंच गरज आहे का, मनाच्या डॉक्टर किंवा काउन्सेलर कडे जायची? आणि आपले जवळचे मानले जाणारे सगळेच तसे म्हंटले तर एक चांगला काउन्सेलर होऊ शकतातच की. 

उत्तर वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वेगवेगळे असे शकते. आता कॉन्टेक्स्ट म्हणजे त्यात, कित्येक गोष्टी येतात, उदाहरणार्थ व्यक्तीचे वय, वैयक्तिक सवयी आणि मूळ स्वभाव किंवा त्याचा गाभा, नाते गोती ,त्यातल्या सकारात्मक नकारात्मक गोष्टी आणि त्यांची तीव्रता,  नोकरी अथवा कामाचे स्वरूप, त्तब्येत किंवा ओव्हरऑल हेल्थकंडिशन. हे सगळे मिळून एक कॉन्टेक्स्ट बनतो आणि मग त्यावरून ठरते की आपण आपले आपले प्रश्न आपणच सोडवू शकतोय का आपल्याला काही काळापुरती मनाच्या डॉक्टर ची गरज आहे.  मनाच्या साठी गोळ्या औषधे घेणे कदाचित कमीपणाचे वाटू शकते किंवा अथवा निरुपयोगी किंवा निरर्थक ही वाटू शकते. पण हे सगळे खूपच सब्जेक्टिव्ह आहे. आणि त्या त्या वेळी योग्य वाटेल ते करावे अशा मार्गावर मग ते जाते. आणि मनाच्या डॉक्टर लाही आपल्याबरोबर कामायचे थोडीच राहायचे असते? त्याचे काम म्हणजे एका "फॅसिलिटेटर" किंवा "एजन्ट" सारखे असते. मग अगदी साधी सुधी मनासाठीची टूल्स अथवा "हत्यारं" (हा जरा खतरनाक शब्द वाटतो पण टूल्स म्हणजेच हत्यारे नाही का? ) का वापरू नयेत असे मला मनापासून वाटते. पण मग त्यात वेळ, पैसे, कॉमिटमेन्ट सगळेच आले..शिवाय लगेच बदल हवा तो मिळायला हवा असेल तरीही ती  मग चुकीची अपॆक्षा ठरते. ह्या बरोबरच जे मनापासून चांगला बदल घडवण्यासाठी म्हणून ह्यात घुसतात त्यांना ह्या हत्यारांचा फायदाही नक्कीच होतो.

मग अजून एक मतप्रवाह ही आहे जो मला स्वतःला आवडतो, तो म्हणजे अगदी सगळेच 'सिम्प्टोम्स बेस्ड' करण्यापेक्षा (सिम्प्टोम्स  म्हणून लेबल लावण्यापेक्षा) तुम्हाला नक्की काय हवे आहे आणि ते तुम्ही कसे अमलात आणू शकता, ह्या पद्धतीने विचार करत आपणच आपले डॉक्टर व्हायचे. ह्यात मग अगदी फारच काही गंभीर प्रश्न नसतील तर मग आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी आपण काय स्पेसिफिक पावले उचलली, काय प्रकारचे विचार ठेवले हे डोक्यात पक्के ठेवले किंवा परत परत बिंबविले तर मग कठीण वाटणाऱ्या गोष्टी सोप्या होऊ शकतात. शिवाय हे तर नक्कीच, जे विमानात बसताना आपल्याला नेहेमीच संगितले जाते, आणि जे आपण नेहेमीच दुर्लक्ष करत ऐकतो, ते म्हणजे "आपला मास्क सगळ्यात आधी वापरा "wear your own mask first before helping the co-passangers (better ). मग त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आपण का करू नये? 



Tuesday, November 6, 2018

दिवाळी , आवराआवर आणि अदलाबदल

दिवाळी, आवराआवर आणि अदलाबदल! कुणाची? मनाची आणि घरातल्या वस्तूंची. आश्चर्य वाटले का? तसे थोडे पटकन लक्षात येणार नाही.

मनाचे आणि घरातल्या वस्तूंचे गणित. मी ह्या गणिताचे धडे माझ्या बाबांकडून शिकले.

आमचे घर अतिशय लहान होते आणि त्यामुळे स्पेस  मॅनेजमेन्ट चे आव्हान नेहेमीच समोर असे. त्यात कमीत कमी खर्चात ते करणे हेही दुसरे आव्हान.  वस्तू एवढ्या छोट्याश्या घरात त्याच त्याच दिसत राहत आणि मग त्यातून निर्माण होणारा तोचतोचपणा ही. ह्या प्रश्नाला उत्तर होते. ते म्हणजे घरातल्या वस्तूंची अदलाबदल उर्फ अफरातफर :-) कशी काय?

बदल म्हणून कधीतरी स्टूल दुसरीकडेच ठेऊन ठेवले. कधी पेन्टिंग ची जागा बदलली. कधी सोफ्याचा अँगल बदलला. कधी एखादी भिंत रंग देऊन घेतली. तर कधी घरातली म्युसिक सिस्टिम दुसऱ्या जागी ठेवली, मग तेच सूर दुसऱ्या जागेवरून म्हणून जरा नवे. तर कधी अदलाबदल , एखाद्या रंगीत शोपीस ची ब्लॅक अँड व्हाईट शोपीस बरोबर. कधी टीव्ही आणि सोफा ह्यांची अफरातफर तर कधी डिम लाईट ची शेड बदल. आणि अश्या असंख्य परमुटशन्स आणि कॉम्बिनेशन्स. अर्थात त्यातली सगळीच अस्थेटिकली छान दिसतील असे नाही . पण तरीही त्यातली प्रयत्नशीलता महत्वाची. की हे नवीन करून बघू कसे दिसतंय ते?

आता विचार केल्यावर लक्षात येते की हे एकदम भन्नाट उत्तर होते त्यावेळेच्या आव्हानांना. आणि बघायला गेलो तर आताही चपखल बसते. थोडा घरात बदल केला, वस्तू वेगळ्या ठिकाणी ठेवल्या , किंवा राऊंड रॉबिन मध्ये फिरवल्या तरी खूप छान बदल त्याच सिस्टिम मध्ये दिसू शकतात. अथात त्यामुळे आपल्याला ही रिफ्रेशेड वाटते.

ह्या वस्तूंच्या  आता मनाशी काय संबंध? तर आहे, खोलवर आहे. आपले मनही कधीकधी बंदिस्त असते. बदलांच्या शोधात असते, तोचतोच पणाला कंटाळलेले असते. आपल्याला माहीतही नसते की मनात किती धूळ साचली आहे किंवा मनालाही rearranegement  ची गरज आहे. किंवा कधी माहित असते पण आचरणात आणता येत नसते. मग काय करायचे? घरासारखेच वस्तूंची अदलाबदल आणि अफरातफर करायची का? तर हो. करायची.

करून बघायला काय जाते? बाबा म्हणायचे, स्वाती तुला कंटाळा खूप येतो बघ. ते गेल्यावर मात्र मी कंटाळ्याचेच विसर्जन केले.खैर, त्याही पेक्षा आपला मनाचा कंटाळा आपण कसा झटकून टाकू शकतो? काही विचारांची गाठोडी वरच्या वॉर्डरोबस च्या कप्यात अथवा माळ्यावर टाकून देऊ शकतो का? काही नवीन फुलांचे गुच्छ आणून आपल्या समोर दिसतील असे आणून ठेवू शकतो का? काही नवीन रातराण्यांची फुलं ओंजळीत धरू शकतो का? किंवा आपल्या मनात खोलवर दडलेली vision statements थोडी दिसतील अशी जवळ arrange करू शकतो का? किंवा काही खोलवर दडलेली दुःखे त्यांचे कप्पे ओपन करून वाऱ्यासारखी भिरकावून देऊ शकतो का? किंवा मनातल्या मनात एखाद्या नवीन ठिकाणी जाऊन येऊ शकतो का? थोडे विचार आणि त्यांचे groups वाकडे तिकडे, पुढे मागे करून आपणच आपल्या मनाच्या घराचे इंटिरिअर डेकोरेटर होऊ शकतो का?





Saturday, October 13, 2018

गादी बुला रही है

झोप हा माझा अतिशय आवडता विषय आहे. त्याबरोबरच गादी सुद्धा . ह्या लेखाच्या कॉन्टेक्सट मधली गादी ही बेड नसून प्युअर गादी आहे. :-) एकदा माणूस गादीत गेला, की गेला , म्हणजे झोपाळू माणूस. मग त्याला आजूबाजूला ढोल ताशे, तोंडावर येणारे सूर्यकिरण , पक्ष्यांचे विविध आवाज, वगैरे वगैरे काहीच ऐकू येत नाहीत. एका मनाच्या अतिशय आनंदी स्टेट मध्ये गादीसारखी साधीसुधी गोष्ट आपल्याला नेऊन ठेवते.

गादीवर मनापासून प्रेम असले पाहिजे आपले, वर्षानुवर्ष आपल्याला जी गोष्ट एक छान झोप द्यायला मदत करते तिचे आपण ऋणी नक्कीच असायला हवे. आता झोप ही प्रत्येक व्यक्तीची 'प्रोप्राईटरी' असते. हक्काची. आणि ती  जगभरातल्या  वेगवेगळ्या रिसर्च प्रमाणे, प्रत्येकाची वेगवेगळी असते. काहींना अगदी थोडकीच, तासांची, मिनिटांची , पुरते, काहींना ९ ते १० तास कमीत कमी लागतात तर काहींना ४ तासही पुरतात.

ह्यात कमी झोप चालणारे माझ्यामते गादीच्या इतक्या प्रेमात नसावेत, तर जास्त झोप लागणारे नक्कीच जास्त प्रेमात असतात गादीच्या. मला कमी झोपून ही अगदी साडेपाच वाजता पहाटेही तरतरीत असणार्यांबद्दल अतिशय आदर वाटतो. मला मनापासून कधीकधी पहाटे उठून योगासने, प्राणायाम, धावणे, चालणे ह्यापैकी काही फिटनेस रि लेटेड गोष्टी कराव्याशाही वाटतात, पण मनातल्या मनात. मग मी पूर्वी स्वतःवर चिडून, तर आता अजिबात न चिडता मनातल्या धावपट्ट्या कव्हर करते. गादीत झोपूनही म्हणजेच आडवे पडूनही आपण मेडिटेशन उर्फ त्यात लागलेली झोप, किंवा शवासन किंवा डीप ब्रीदिंग करण्याच्या क्लुप्त्या मला सुचल्या आहेत आणि त्या मी इम्पलिमेन्ट ही केल्या आहेत. पक्ष्यांना, कबुतरांना मी एक पत्ररूपे मेसेज ही पाठवते, की "तुम गाओ हम सो जायें, कुछ सपनों में खोजायें, तुम गाओ हम सो जायें."

आता स्वप्नांचे बोलायचे झाले तर तीही नेमकी छान छान, अगदी उठायच्या वेळीच पडतात, मग ऑपशन असा राहतो की ती पूर्ण करायची का मग झपकन उठायचे? सुंदर सा कर्णकर्कशः अलार्म परत परत वाजत असतात्ना?
खरं तर पहिल्या अलार्म ला उठणे खूप महत्वाचे असते, एकदा मिस झाला की झाला. थांबला तो संपला. म्हणतात ,तसाच स्नूझला तो संपला.

जो खरा आणि ओरिजिनल झोपाळू असतो तो आपली झोप पूर्ण करायला कितीही माइल्स जाऊ शकतो. जपानी लोक इतके काम करतात कि ते गादी असो नसो, कुठेही झोप कव्हर करतात. आपल्या मुंबई ट्रेन तर झोप कव्हर करण्याचे एक मोठे साधन आहे. कार मधल्या सीट उर्फ गादी मध्ये ही झोप काढता येऊ शकते, अर्थात जर गाडी चालवत नसलात तर.

ही सगळी अलार्म, पहाट , सकाळ, पक्षी , झोप, गादी , पांघरूण ह्यांची झटपट, हे झोपाळू माणसांचे एवढे खोफनाक कॉम्बिनेशन आहे की बस. ज्याचे जळते शेवटी त्यालाच कळते. आणि झोपेचा वर्षानुवर्ष बॅकलॉग असलेली माणसं ह्या कर्म-फळ चक्रातून पळवाट काढताच राहातात. एक मन सांगत राहतं ही "रुक जा रात ठहर जा रे चंदा" (आता तर सूर्यही आला, तो काही चंद्रासारखा रोमँटिक नाही), आणि दुसरे मन, जे उद्योगशील आहे , ते म्हणत राहतं गादीला : "कोई कितना भी बहकावे, चले चलो" :-)



Tuesday, October 2, 2018

माइनस्वीपर्स

माइनस्वीपर्स हा माझा पहिला आवडलेला कॉम्पुटर गेम. कॉम्पुटर इंजिनीरिंग च्या दिवसांत हा गेम नुकताच आला असावा. फारसे गेमिंग मध्ये नसूनही तेंव्हा खूप धमाल यायची हा गेम खेळताना मला, समुद्रात पाठवल्या जाणाऱ्या माइनस्वीपर्स सारखेच  काहीतरी लपलेले बॉम्ब्स डिटेक्ट व्हायचे आणि ते जेवढे टाळता येतील आणि ते करत करत बोर्ड क्लिअर करता येईल टिकते जास्त पॉईंट्स मिळत जातात.

अर्थात खूप वर्षात हा गेम खेळणे मागे पडले, काळ काम आणि वेग ह्याची गणिते सोडवता सोडवता एक फेवरीट खेळ मागे पडला. आता अचानक का आठवला हा खेळ तर प्रत्यक्षातच अचानक लिफ्ट मध्ये नुकतेच "hidden mines " चा स्फोट झाला. कारण तसे वरवरचे आणि साधेच होते.

मी स्वराला घेऊन मी नेहेमीप्रमाणेच घाईघाईत लिफ्ट मधून चालले होते, शाळेत बससाठी सोडायला. उशीर. अचानक एक मैत्रीण भेटली, तशी खूप ओळख नाही पण तरीही मैत्रीण. काहीतरी लहान मुलांवरून संवाद सुरु झाला आणि ही मैत्रीण माता एकदम जबरदस्त भडकलीच. मीही घाबरून गेले. म्हंटले, काय झाले? म्हणाली काल रात्री मी मुलीवर  (हिची मुलगी सहावीत आहे) प्रचंड जोरात ओरडले आणि एकदम तिने विचारले आवाज ऐकू आला का? मी म्हंटले नाही. मग म्हणाली वर्क-लाईफ बॅलन्स खूप कठीण होतोय, मुलगी अभ्यासचं करत नाही आणि हे असेच चालत राहिले तर मी तिला सांगितले आहे कि वर्ष रिपीट करावे लागेल. एकदम आग पाखडत होती आणि आश्चर्य म्हणजे एक रात्र निघून सरूनही तिच्याकडच्या mines एकदम "activated " होत्या. राग, frustrations , तळमळ , काळ काम वेग ह्यांचे ना जमणारे गणित (ती डॉक्टर आहे) आणि एकंदरीतच बहुतेक बरेच काही, एखाद्या "tip of an iceberg" सारखेच. स्वरा नेहेमीप्रमाणेच थोडीशी टरकलेली , आता तिच्या मैत्रिणीचे काय होणार ह्या कल्पनाने आणि कदाचित तिचेही काय होणार ह्या कल्पनेनेही .

हे सर्व minesweeping लिफ्ट मधल्या ३ मिनटात. मला जे काही सुचले त्याप्रमाणे मी तिला थोडेसे शांत केले. पण तरीही तिला अख्खा "बोर्ड क्लिअर" करायला वेळ  लागेल अशी चिन्ह दिसली. मी स्वराकडे बघून हसले, तीही मस्त हसली, मलाही माझे treasure सापडले आणि आम्ही मात्र दिवस एक आनंदी नोट वर चालू केला.

खैर, स्ट्रेस ला एक अनन्यसाधारण महत्त्व दिले जात आहे कधीकधी. कधीतरी असे स्फोटक बनणे कदाचित चालेल ही. बऱ्याचदा ते जस्टिफाईड . पण तरीही सतत अशा स्फोटक किंवा माईनस्वीपर्स मध्ये राहणे आणि मार्ग क्लिअर करणे नक्कीच छान नाही.

एक  छान साधे आनंददायी आयुष्य अपेक्षित आहे. ह्यात थोड्याफार mines , पण जास्तीत जास्त threasures असतील. गेम क्षणाक्षणाला स्फोटक नसेल, तर बुद्धिबळासारखा आपल्या बुद्धीची जास्तीत जास्त कुवत आजमावून पाहणारा असेल, आपल्याच betterment साठी , किंवा एखाद्या कॅरम बोर्ड सारखा असेल, सोंगटी घेता आली तरी छान, नाही गेली तरी स्फोट तरी होऊ देत नाही आपण तिथे. किंवा river - rafting सारखा असेल ज्यात आखा गेम निसर्ग च्या अफाट सामर्थ्याकडे झुकून त्याप्रमाणे पुढे सरत जाणारा असेल. आपला गेम आपण ठरवायचा.


Monday, September 24, 2018

व्यक्ती आणि वल्ली आणि सवयी

कधीपासून व्यक्ती आणि वल्ली आणि त्यांच्या (त्रस्त करणाऱ्या) सवयी ह्यांबद्दल लिहायचे होते. विषय तसा नाजूकच. प्रत्येकाला आपल्या (इतरांना त्रस्त करणाऱ्या) सवयीनबद्दल नेहेमीच त्या बरोबरच आहेत असे वाटत  असते. पण त्याच  दुसऱ्या व्यक्तीला पराकोटीचे त्रस्त करू शकतात हेही तेवढेच शाश्वत सत्य आहे. आणि अशा प्रत्येक गलिच्छ सवयीला एका जास्त अक्सेप्टेबल लेव्हल मध्ये परावर्तित करणेही तेवढेच शक्य असते. अर्थात तेही मनात आणले तर.

आता मचामचा आवाज करत खाण्याचेच बघा ना. कित्येक जण अशक्य कोटींचे आवाज करत खातात आणि त्यांचा नक्कीच इंटरफरन्स आजूबाजूच्यांना होऊ शकतो.  हाच आवाज एका ठराविक पद्धतीने खाऊन कमी करता येतो पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? तेच तोंडातला घास इतरांना दिसणे अथवा दाखवणे ह्या सवयीचे. का असा करताय लोकं? एकतर त्यांना माहीतच नसते की ही सवय चांगली नाही, किंवा त्यांना ते मान्य करून कॉन्व्हर्ट व्हायचे नसते. तुम्ही कोण आलात आम्हाला सांगणारे? मग हे ऐसेची चालायचे!

अजून एक खास निदर्शनात आणून देण्यासारखी सवय म्हणजे ढेकर. मी लहान असल्यापासून ढेकर आली का आला ह्या वादातीत विषयावर विविध चर्चा ऐकल्या आहेत (ज्या मला निरर्थक वाटल्या :-), तेंव्हाही आणि आताही ). ढेकर चे लिंग ओळखण्यापेक्षाही व्यापक प्रश्न ह्या जगात आहेत ते म्हणजे ढेकर देताना आवाज करू नये किंवा आलाच आवाज तर तो दाबून टाकणे आणि तसेही न करता आले तर सॉरी तरी म्हणणे हे एक ट्रान्सफॉरमेशन प्रोजेक्ट आहे. अर्थात तेही जर मनात आणले तरच.  तुम्ही कोण आलात आम्हाला सांगणारे? मग हे ऐसेची चालायचे! अशाच प्रकारच्या "दुसऱ्या प्रकारच्या" पादा-वाजाचेही तेच. पण मुळात सेल्फ-अडमिटन्स अशा वेळी कमी पडतो. ह्याच "फिबोनाची सिरीज (गणितातली एक नंबर सिरीज)" मध्ये मग तोंडावर खोकणे, शिंकणे, घसा जोरजोरात खाखरणे, चप्पल फरफटवत चालणे, मेटल च्या खुर्च्या खराखरा ओढणे, इत्यादी  नंबर्स ही येतात. ह्यात नैसार्गिग आणि अपरिहार्य गोष्टी सोडल्या तरी देखील इतरांना त्रास होऊ नये एवढी खबरदारी अपेक्षित असते. उदाहरणार्थ खोकणे नैसर्गिक पण स्वतःच्या तोंडावर हात न ठेऊन खोकणे हा एक परमार्थ. 

अजूनही एक सवय खास लक्षात आणून देण्यासारखी ती म्हणजे उदबत्त्या आणि अत्तरे. दोन्हींचे उद्दिष्ट चांगलेच. पण भस्काभर उदबत्त्या लावून अख्खी  खोली व्यापून टाकून एक आगळाच आनंद मिळत असावा, पण त्याचे दुष्परिणाम त्या फवाऱ्याच्या दुसऱ्या एन्ड ला असलेल्या "ऑडीएन्स " ला भोगावे लागतात. आता मग एकतर प्रोऍक्टिव्हली सांगणे, सहन करणे किंवा घमघमाट आणि धूर ह्यातून बाजूला निघून जाणे हेच उपाय शिल्लक राहतात. 

तर अशी ही फिबोनाची सिरीज चालूच राहते आणि माणसाची फरफट ही. गम्मत म्हणजे कोणीच व्यक्ती परफेक्ट नसते; आणि अशा असंख्य व्यक्ती आणि वल्ली ना आपण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मध्ये भेटत असतो. इतरांना आपला त्रास होऊ नये अशी थोडीतरी भावना प्रत्येकानेच ठेवली तर सगण्यांसाठीच transformation आणि continuous improvement  चालू राहू शकते. नाहीतर, तुम्ही कोण आलात आम्हाला सांगणारे? मग हे ऐसेची चालायाचे!