Monday, September 24, 2018

व्यक्ती आणि वल्ली आणि सवयी

कधीपासून व्यक्ती आणि वल्ली आणि त्यांच्या (त्रस्त करणाऱ्या) सवयी ह्यांबद्दल लिहायचे होते. विषय तसा नाजूकच. प्रत्येकाला आपल्या (इतरांना त्रस्त करणाऱ्या) सवयीनबद्दल नेहेमीच त्या बरोबरच आहेत असे वाटत  असते. पण त्याच  दुसऱ्या व्यक्तीला पराकोटीचे त्रस्त करू शकतात हेही तेवढेच शाश्वत सत्य आहे. आणि अशा प्रत्येक गलिच्छ सवयीला एका जास्त अक्सेप्टेबल लेव्हल मध्ये परावर्तित करणेही तेवढेच शक्य असते. अर्थात तेही मनात आणले तर.

आता मचामचा आवाज करत खाण्याचेच बघा ना. कित्येक जण अशक्य कोटींचे आवाज करत खातात आणि त्यांचा नक्कीच इंटरफरन्स आजूबाजूच्यांना होऊ शकतो.  हाच आवाज एका ठराविक पद्धतीने खाऊन कमी करता येतो पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? तेच तोंडातला घास इतरांना दिसणे अथवा दाखवणे ह्या सवयीचे. का असा करताय लोकं? एकतर त्यांना माहीतच नसते की ही सवय चांगली नाही, किंवा त्यांना ते मान्य करून कॉन्व्हर्ट व्हायचे नसते. तुम्ही कोण आलात आम्हाला सांगणारे? मग हे ऐसेची चालायचे!

अजून एक खास निदर्शनात आणून देण्यासारखी सवय म्हणजे ढेकर. मी लहान असल्यापासून ढेकर आली का आला ह्या वादातीत विषयावर विविध चर्चा ऐकल्या आहेत (ज्या मला निरर्थक वाटल्या :-), तेंव्हाही आणि आताही ). ढेकर चे लिंग ओळखण्यापेक्षाही व्यापक प्रश्न ह्या जगात आहेत ते म्हणजे ढेकर देताना आवाज करू नये किंवा आलाच आवाज तर तो दाबून टाकणे आणि तसेही न करता आले तर सॉरी तरी म्हणणे हे एक ट्रान्सफॉरमेशन प्रोजेक्ट आहे. अर्थात तेही जर मनात आणले तरच.  तुम्ही कोण आलात आम्हाला सांगणारे? मग हे ऐसेची चालायचे! अशाच प्रकारच्या "दुसऱ्या प्रकारच्या" पादा-वाजाचेही तेच. पण मुळात सेल्फ-अडमिटन्स अशा वेळी कमी पडतो. ह्याच "फिबोनाची सिरीज (गणितातली एक नंबर सिरीज)" मध्ये मग तोंडावर खोकणे, शिंकणे, घसा जोरजोरात खाखरणे, चप्पल फरफटवत चालणे, मेटल च्या खुर्च्या खराखरा ओढणे, इत्यादी  नंबर्स ही येतात. ह्यात नैसार्गिग आणि अपरिहार्य गोष्टी सोडल्या तरी देखील इतरांना त्रास होऊ नये एवढी खबरदारी अपेक्षित असते. उदाहरणार्थ खोकणे नैसर्गिक पण स्वतःच्या तोंडावर हात न ठेऊन खोकणे हा एक परमार्थ. 

अजूनही एक सवय खास लक्षात आणून देण्यासारखी ती म्हणजे उदबत्त्या आणि अत्तरे. दोन्हींचे उद्दिष्ट चांगलेच. पण भस्काभर उदबत्त्या लावून अख्खी  खोली व्यापून टाकून एक आगळाच आनंद मिळत असावा, पण त्याचे दुष्परिणाम त्या फवाऱ्याच्या दुसऱ्या एन्ड ला असलेल्या "ऑडीएन्स " ला भोगावे लागतात. आता मग एकतर प्रोऍक्टिव्हली सांगणे, सहन करणे किंवा घमघमाट आणि धूर ह्यातून बाजूला निघून जाणे हेच उपाय शिल्लक राहतात. 

तर अशी ही फिबोनाची सिरीज चालूच राहते आणि माणसाची फरफट ही. गम्मत म्हणजे कोणीच व्यक्ती परफेक्ट नसते; आणि अशा असंख्य व्यक्ती आणि वल्ली ना आपण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मध्ये भेटत असतो. इतरांना आपला त्रास होऊ नये अशी थोडीतरी भावना प्रत्येकानेच ठेवली तर सगण्यांसाठीच transformation आणि continuous improvement  चालू राहू शकते. नाहीतर, तुम्ही कोण आलात आम्हाला सांगणारे? मग हे ऐसेची चालायाचे! 



Tuesday, July 3, 2018

काला चष्मा आणि जागतिक म्युसिक डे

गेले कित्येक दिवस स्वरा काला चष्मा नावाचे गाणे मनोभावे म्हणत आहे.  हे गाणे जेंव्हा पहिल्यांदा ऐकले तेंव्हा मी खरोखरच प्रभावित झाले,  त्यातले काव्य, त्यातले पुन्हा पुन्हा काळा काळा चष्मा म्हणणे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे म्युसिक. सगळेच रम्य. त्यात स्वरा कडे काला चष्मा आहे सुद्धा, मी अजूनच घाबरून मी स्वतःच्या चष्म्याचा रंग बघितला, नशीब तो निळा होता/आहे :-). अर्थात हे सगळं चालू असताना मी मनावर घेतला की कितीही  कठीण गेले तरी काला चष्मा चे गाणे (चित्रांकन) बघायचेच आणि त्यामागचा lyrics आणि भाव समजून घ्यायचा.

एकदम जोरदार ठेक्यातलेच गाणे अर्थात. अरे पण त्यात  कतरिना ने घातलेला चष्मा हा चष्मा नव्हताच , तो तर गॉगल होता. त्यात गाण्यातल्या सर्वांनीच आपापला काळा चष्मा उर्फ गॉगल घातलेला. मला हे गाणे अजूनच deep आणि meaningful वाटायला लागले. lyrics चा नीट अभ्यास केल्यावर कळले की मुख्य संदेश ह्या गाण्यातला काला चष्मा नसून गोरे मुखडे पे जचता है हा आहे. आता जचणारच. काळा गॉगल घातल्यावर थोडाफार स्मार्टनेस एन्हान्स होतोच (असलाच तर). मी कतरीना बद्दल नाही बोलत आहे, तर ह्या गाण्याच्या अनोख्या lyrics बद्दल :-)

असो , तर हे आणि अशा अनेक गाणी आजकालच्या (आणिआधीच्याही ) मुसिक इंडस्ट्री मध्ये तरुन आहेत. शेल्फ -लाईफ एकदम थोडे, पंजाबी ठेका आणि lyrics मावतील ते. entertainment इंडस्ट्री असल्याने जे चालते आणि जे लोकांना तेवढ्यापुरते आवडते, dance साठी एकदम फिट  आणि थरारक वाटते, ते नक्कीच ऐकले जाते.

ह्यात right /wrong असे काही नाही. सगळे सूर आपण सूर म्हणून बघायला लागतो तेंव्हा ते सूरच असतात.

पण तरीही एक ठोका चुकतो तो क्लासिक पियानो च्या सुरांनी, एक ठोका चुकतो तो अजूनही अव्वल संगीत आणि lyrics असलेल्या 'आओगे जाब तूम सारख्या गाण्यांनी किंवा माइल्स ऑफ स्काय सारख्या माझ्या ऑल टाइम favourite असलेल्या 'सेल्टिक ' मुसिक ने.

नुकताच जागतिक मुसिक डे झाला. त्यानिमित्ताने एक मात्र नक्की कि आपल्या लाईफ मध्ये मुसिक चे अनन्यसाधारण  स्थान होते, आहे आणि असेल. आबालवृद्धाना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यात आहे. Heal करण्याची अचाट शक्ती मुसिक मध्ये आहे. पियानो, कीबोर्ड त्यातून येणारे सूर ह्यांच्याशी माझे स्वतःचे असे एक अतूट नाते आहे.  लहानपणापासून ऐकलेल्या प्रत्येक गाण्याबरोबर एक रेशीमगाठ आहे. आणि म्हणूनच असे नाते जोपासलेल्या प्रत्येकालाच world music day बद्दल शभेच्छा.


Friday, June 15, 2018

SATC, Veer de and alike

नुकतेच SATC उर्फ सेक्स अँड द सिटी ह्या प्रख्यात सिरीयल ला वीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खूप काही वाचायला मिळाले. अर्थात मला आवडले. ही सिरीयल , त्यानंतर आलेल्या त्यावरच्या मूव्हिस एकदम धमाल होत्या आणि त्यातल्या कॅरी आणि गॅंग मधल्या सगळ्याच जणी आपापल्या जागी एकदम युनिक होत्या. ह्या सिरिअल्स वर्षानुवर्ष बघणारे ह्या चौघी आणि त्याच्या लाईफ मधले असणाऱ्या व्यक्ती यांच्यात कळत नकळत गुंतत गेले. कुठेतरी स्वतः ला शोधत तर कुठेतरी स्वतःच्या प्रश्नाची उत्तरे शोधत. आणि ह्यात फक्त फिमल प्रेक्षक च नव्हता पण मेल फिमेल दोन्ही; आणि वेगवेगळ्या वयाच्या प्रेक्षकांना SATC आवडत गेली. शिवाय ही सिरीयल /मुव्ही मुळात पुस्तकावर आधारलेली होती. आणि त्यात असेही ऐकले आहे मी की ह्यातल्या चारही व्यक्तिरेखा खरा तर एकाच व्यक्तीचे वेगळेवेगळे पैलू आहेत. आज कॅरी आणि गॅंग चाळीशीत आहेत, आणि त्याचे प्रेक्षकही वीस साल बाद आहेत :-)

तर अचानक मला SATC , कॅरी अँड गॅंग बद्दल लिहायचे कसे काय सुचले? तर  नुकतीच बघितलेली  मुव्ही - वीर दे वेडींग! मुव्ही बघताना कित्येक ठिकाणी SATC चा भास झाला. Anil Kapur must be one of those  SATC inspired ones. आवडली का ही मूवी मला ? एस अँड नो . रेलेशन्स, मैत्री , व्यक्ती स्वातंत्र्य, समाज , सेक्स , रीती रिवाज , फॅमिली , फेमिनाईन , फेमिनीसम अशा बऱ्याच गोष्टींवर (at least in Indian context ) एक प्रामाणिक आणि खुले आम सवाल जवाब वेगवेगळ्या सीन मधून दिसत राहतात. एक बेदरकार दृष्टिकोन. बरेचसे चित्रीकरण दिल्लीतल्या बिझ  circal मधले असल्यामुळे त्या अनुषंगाने आलेल्या सामाजिक "slice" पण बघायला मिळतो.

पुन्हा SATC  कडे वळलो तर आठवत जातात त्या चार मैत्रिणी , कॅरी , समान्था , शार्लोट , मिरांडा . कॅरी संवेदनाक्षम, लेखिका, फॅशनिस्ट , रेलेशन्स च्या बाबतीत कन्फयुज्ड , आणि anxious. मिरांडा करिअर ओरिएंटेड,  नियमावलीप्रमाणे चालणारी, स्वतःची "बिनधास्त" बाजू बोलायला चालायला घाबरणारी , अर्थात ती  बाजूही हवी ही असणारी, फॅमिली रेलेशन्स आणि पालकत्व अशा बाबतीत किती करावे किती नाही ह्यात गडबडलेली. समान्था अर्थातच सेक्स आणि त्याबाबतीतले स्वातंत्र्य मनापासून आणि कोणत्याही  प्रकारे अपराधी न वाटून घेता जगणारी. सुख म्हणजे फन आणि त्यापलीकडे फॅमिली मुले विचारीपणा वगैरे हद्दीबाहेर ठेवणारी. स्पष्टवक्ती. शार्लोट म्हणजे गुणी मुलगी, सगळेच परफेक्ट हवे नवरा फॅमिली लूक्स गुडी गुडी पण हे सगळं करता करता स्वतः कशी आहे आणि तिला नक्की काय हवे आहे ते थोडेफार विसरलेली, नंतर कधीतरी गवसलेली.

अर्थात ही खूपच कमी शब्दात ह्या सगळ्या व्यक्तिरेखांची  मला मांडता आलेली ओळख आहे. ह्या चारही अमेरिकन मैत्रिणी मला आपापल्या जागी भन्नाट आवडल्या, ह्याचे कारण म्हणजे त्यांची मैत्री. एकमेकींना दिलेला सपोर्ट. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांचा एकमेकांमधला , त्यांच्या   व्यक्तीगत  रिलेशनशिप्स मधला. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या वेळी.

आता वीर दे अँड व्हॉट इस टेक वे? :-) वीर दे इंडियन लेन्स मधून बघितला तर नक्कीच एक चांगला प्रयत्न ज्यात फिमेल्स आपल्या भावविश्वाशी प्रामाणिक आहेत किंवा बनतात, सेक्स विषयक गरजांबद्दल जास्त मोकणेपणाने बोलतात, वागतात, परफेक्ट बनायचा ध्यास न ठेवता आपापल्या इम्परफेक्शन्स ना सामोरे जातात, जशा आहोत तशा. वीर दे मधला स्वरा भास्कर चा एक सीन बराच वादातीत झाला. त्यात  मला  एवढा issue करण्यासारखे मला काहीच वाटले नाही. शिखा तन्सानिया  सगळ्यातछान काम, एकदम as-is ऍक्टिंग . वीर उर्फ करीना (भारतीय कॅरी) सोडून बाकी सगळ्या काही SATC शी खूप मिळत्या जुळत्या नाहीत. तरीदेखील कॅरी अँड गॅंग कुठेतरी दिसत राहते, SATC वाले गॅंग ला अबू धाबी ला पाठवतात तर वीर दे फुकेत ला.  वीर दे मध्ये फकफकाट आणि फाऊल भाषा सर्रास वापरली आहे. आणि अगदी मारून मुटकून बेफिकीरपणा आणि "फॉरवर्ड नेस" दाखवण्याचा असफल प्रयत्न वाटतो.

ह्या सगळ्या संदर्भात आणि सेक्स अँड सेक्सयुआलिटी बद्दल चे फ्री टॉक ऐकताना, एक अजून गोष्ट  नोटीस करण्यासारखी म्हणजे tabu vs reaility check. मध्यंतरी एक पुस्तक वाचले, इट्स नॉर्मल. डॉक्टर वत्सा नावाच्या प्रख्यात  सेक्सपर्ट ज्यांचा  मुंबई मिरर मधला कॉलम जन सामान्यात पोचला. माझी एक मैत्रिण त्या पुस्तकाच्या त्या पुस्तकाच्या मेकिंग मध्ये होती. हे पुस्तक आबाल वृद्धांना reality check मध्ये नक्कीच मदत करेल :-) शिवाय खूप काही हसण्याचे मोमेंटस.

एकंदरीत SATC , वीर दे अशा प्रकारच्या टॉपिकस मध्ये हसायला आणि हसवायला ही खूप स्कोप असतो, कारण ह्यातली coversations, काही विसंगतीतून आलेले तर काही प्रासंगिक विनोद.

ह्या पोस्ट मध्ये आतापर्यंत जरी सगळ्या फिमेल व्यक्तिरेखांबद्दल च बोलले गेले असले तरीही हे ही खरे आहे की कॅरी अँड गॅंग चे समांतर मेल कॉउंटरपार्टस ही असावेत! आणि प्रत्येकामध्ये दडलेले काही अंशी सारखे तर काही अंशी वेगळेच ..

Friday, June 8, 2018

एक्सट्रा आणि ट्रिपल एक्सट्रा

नुकतीच एक स्वरा च्या आधीच्या शाळेत शिकवणारी टीचर भेटली. नेहेमीचेच हाय हॅलो झाले. मग म्हणाली स्वरा ला तुम्ही स्पोर्ट्स ला नाही का घातले. मी विचारला कुठचा स्पोर्टस , शाळेत तर कंपलसरी आहेच स्पोर्ट्स फिटनेस ऍक्टिव्हिटी , एक नाही तर तीन आहेत. मग म्हणाली ते तर आहेच, पण अजून एक्सट्रा खेळ. मी मनातल्या मनात म्हंटलं इथे आहे तेच होत नाहीये, मुळात मनुष्यबळ कमीच:-) शिवाय एक्सट्रा मुळात लागणारच आहे कशाला? असो, मी विचारला की कुठे नेतेस तुझ्या मुलाला? मग तिने इथे काही किलोमीटर अंतरावरच्या एका स्पोर्ट्स अकॅडेमि चे नाव सांगितले. मी म्हंटलं मस्तच. स्वरा लाही मी न्यायचे तिथे पूर्वी. मग म्हणाली एखादे अजून एक राखीव स्पोर्ट्स हवेच तिला, शाळेतल्या शिवाय. म्हंटलं हे सगळं शाळेतून दमून भागून मुलं आल्यावर? ते पण दोन दोन तीन तीन स्पोर्ट्स आक्टिविटी आधीच पार पडून आल्यावर? मग म्हंटलं गुड ऑन यू . :-)


पण हिच्या एक्सट्रा आक्टिविटी काही संपेनात. शाळा सोडून एकदन्तरित बरेच काही करते ही. मग म्हणाली जर तुला अभ्यासासाठी ट्युशन लावायची असेल तर अतिशय खात्रीलायक private शिक्षिका आहे तिच्या ओळखीची. माझा पुन्हा प्रश्न, एवढ्या लहान पोरांचा काय तो अभ्यास आणि त्याला ट्युशन? अर्थात लागत असेल गरज. मी नाही म्हणत नाही. पण ह्या सगळ्याचा अतिरेक वाटतोय मला, अजून थोडा एक्सट्रा, अजून तिकडून डबल एक्सट्रा , मग अजून कुठून तरी ट्रिपल समाधी आणि मग हे सर्व सोपस्कार पार पडले, की मग एक्सट्रा चॉकोलेट किंवा चीझ . मग स्पोर्ट्स मध्ये मिळवलेला फिटनेस आणि कमावलेली तब्येत पुन्हा घटवणे आणि पुन्हा तेच वर्तुळ.


हां आणि अजून एक जाताजाता, ती म्हणाली, बरा का स्वरा, फक्त ए प्लस च मिळवायचा हा का शाळेत. :-)  मग च मी  घरी party ला बोलावेन . म्हणजे थोडक्यात  सगळीच आय पी एल, भेळ  आणि खिचडी. And then of course this conditional friendship, हा हा . 


मी असे अजीबात म्हणत नाहीये की एक्सट्रा गोष्टी करू नयेत.  Excellence is my persuit too.  पण असा सगळंच ट्रिपल X एक्सट्रा एक्सट्रा करता करता आपण साधासुधा ल सा वि पण काढायला विसरलो तर मुश्किल आहे. काळ काम वेग ह्याचे गणित साधेच आहे तसे. त्यात प्रत्येकाकडे असलेले मनुष्यबळ. ह्यांची सांगड घातली तर कदाचित आपल्याला गणितं अजून थोडी चांगली सोडवता येतील. नाही का?

Friday, August 1, 2014

माझिया मना

असेच एकदा विचार आला की हे जे मी मी म्हणणारे माझे मन आहे ते आहे तरी कसे? दिसते तरी कसे? आणि हे जे सगळे असंख्य प्रकारचे विचार येत असतात मनात त्यांच्या उगम आहे तरी कुठे? लांब, खोलवर? त्यांना काही आकार ऊकार तरी आहे का?  अगदी उगम शोधायलाच गेलो विचारांचा तर ते सगळे निर्विकार आहेत, abstract आहेत ka? abstract च असणार. कारण ही जी आपण भाषा वापरतो, एकमेकांशी संवाद किंवा विसंवाद किंवा असंवाद साधायला, तिलाही आपल्या आपल्या मर्यादा आहेतच की. आपल्याला कितीतरी गोष्टी व्यक्त करायच्या असतात शब्दात, पण शब्द कमी नक्कीच पडू शकतात..खरा तर भाषा हा विषय  माझा अतिशय आवडता आहे..कारण शब्दच तर असतात आपल्याकडे व्यक्त करायला..मग तरीही अगदी भाषेवर चांगले  प्रभुत्व असलेल्यांना सुद्धा का कठीण जात असेल मनाचा थांगपत्ता लावायला? किंवा अशा काय गोष्टी आहेत ह्या abstract आणि व्यक्त करता न येणाऱ्या राहतात? 

असे वाटते की हा एक वेगळाच प्रांत आहे..आपली स्वप्ने  जिथे राहतात, आपले स्वगत जिथे राहते, आपले आपल्याशीच असलेले वेगवेगळ्या layers वर असलेले नाते-गोते, कित्येक न बोललेल्या आणि फ़क़्त अनुभवलेल्या सुंदर गोष्टी, आपल्या छोट्या छोट्या इच्छा, आशा आणि हा दिल है छोटासा...आपले आजूबाजूला फुलणाऱ्या गोष्टींवरून फुलणे आणि कोमेजणार्या गोष्टींवरून कोमेजणे..आणि कधी कधी तर आपल्या मोहरून येण्याच्या क्षणांना धरून आजूबाजूच्या सर्वच गोष्टी तशाच मोहरून येताना दिसणे..आणि अखेर आपले कोमेजणे बघून आणि अनुभवून आजूबाजूच्या गोष्टीही तितक्याच intensity ने कोमेजणे..हा भास आहे का सत्य..शाश्वत? भासच असावा कारण तसे बघितले तर कायम टिकणारे असे सत्य असे काहीच नसते..निसर्ग नियमांप्रमाणे ते हि बदलत जाते..आपली आधीच कात टाकून नवीन काहीतरी परिधान करते..

आणि आपण पण ह्या सगळ्या mind-to-universe खेळामध्ये सतत बदलत असतो..कधी आपण गोष्टी आहेत तशा मानून किंवा स्वीकारून मोकळे होतो. मनाला तसे फार त्राण नसते राहिलेले..पण कधीकधी मात्र एकदा question केले की करतच जातो..हे सगळेच आहे हे असेच का? मोडक्या तोडक्या भाषा मग आपल्या कामाला येतात..आपली बौद्धिक क्षमता पणाला लावतो..पण नुसते question केले म्हणजे उत्तरे मिळतातच असे थोडीच आहे? यात कमीपणाचे असे काहीच नाही. उत्तरे शब्दात मिळत नाहीत काही वेळा..हेच खरे. इथे भाषा संपते. मनाचा खेळही संपतो. आपण एका वेगळ्याच abstract प्रदेशात जातो. जिथे एखादा form असतो..चित्र असते. पुन्हा abstract च. किंवा एखादा आवाज असतो. तोही नेहेमीचा नाही. abstract असा. एखादा स्पर्श असतो. तोही abstract. एखादा मोकळा श्वास असतो. तेच उत्तर असते. आपल्याला ते माहीतही असते पण त्यापर्यंत पोचायला वेळ लागतो. पण  उत्तर त्या ठराविक  form मध्येच मिळते. पुन्हा शब्दांचा खेळ चालू केला मनाने की मग आपण हरवून जातो. ह्या सगळ्यात abstract का होईना उत्तर मिळाल्याचे समाधन मात्र मिळते. ज्याच्यासाठी हा सगळा अह्हाहास चालू आहे ते का ते काही क्षण का होईना आपल्याला कळते..


Wednesday, April 23, 2014

गजरे

तसे कितीतरी जाता येत दिसतात आणि मीही दुर्लक्ष करते आजकाल. तीच ती फुले आणि त्यांचे गजरे हातात घेऊन विकणारी माणसे, जास्त करून बायका. गर्दी. त्याच त्या पानांच्या पुड्या. कित्येक  वर्षे गेली आणि मी ही अशीच गजरा विसरलेली राहिले आणि आज अचानक आई म्हणाली, वेळ चांगल्या रीतीने घालवण्यासाठी मी थोडी फुले घेऊन आले मोगर्याची आणि मस्त गजरे केले, तुलाही दिले असते.

अचानक मधली सगळी वर्षे हवेत विरून गेली आणि मला एकदम नुसत्या त्या मोगर्याच्या देखण्या फुलांच्या आणि कळ्यांच्या आठवणीने एकदम प्रसन्न वाटले. आणि त्यांचा दिसण्यापेक्षाही एकदम धमाल फ्रेश वाटवून सोडणारा गजर्याचा वास..

एक एक कारागिरी असते..गजरे करणे ही पण. आणि तेही त्याच्यातल्या सर्व फुलांमध्ये सुसूत्रता वाटेल असे. माझी आई ने ही कला उत्तम शिकली होती. कित्येक महिने वर्ष अशी गेलेली की संध्याकाळ अखी च्या अखी फुले sort out करणे आणि गजरे बनवणे ह्यात जायची. मी ह्या सर्वात प्रेक्षक जास्त असे, थोडा प्रयत्न ही केला होता गजरे बनवण्याचा आणि जमले ही. पण हा गजरा महोत्सव जो आमच्याकडे चालला तो मात्र अफलातून होता. मी त्या फुलांशी इतकी एकरूप झाले की बस. सगळ्यात मुख्य म्हणजे आपण कित्येकदा एखाद्या कारागिरी चे final outcome बघतो. पण सुरवातीपासून शेवटी ते कसे घडले हे बघायला मिळत नाही, जमत नाही किंवा आपले लक्षच जात नाही त्या process कडे.

आणि हे सगळे गजरे जसे न सांगता आले, तसेच गेलेही. ते काही उदबत्तीचा धूर नव्हते की हवे तेंव्हा हवे तितके उग्रपणे पसरत राहतील. ते सर्व real होते. मी विचार करत राहिले- आईला आताही जमले असतील का तसेच गजरे करायला. आणि मग मधल्या इतक्या वर्षांचे काय? का राहून गेले असतील ते बनवायचे ? मी तर माझ्या स्वतःच्या अभ्यास आणि करिअर मध्ये बुडून गेले कि ते गजरे कुठे गेले ह्याचा विचारही मी केला नाही..आता खंत वाटली थोडीशी. हा सगळा गजरा phenomenon असा विरून का गेला?

पण असो. का कसे कधी कुठे पेक्षा आजचा दिवस आईने गजरे करून घालवला ह्याचे खूप छान वाटले. माझ्यापर्यंत ही ते पोचले..मलाही ते भिडले आणि पुन्हा एकदा त्यांची आठवण करून गेले. कुठेतरी काहीतरी फुलले तरी..? 

Wednesday, December 18, 2013

मोकळ्या हवेला धुक्याची मिठी

हे असले काव्य तुम्ही बहुतेक ऐकले नसेल. आणि न ऐकलेलेच बरे, असे मला वाटते, कारण मी ते live ऐकून खो खो (रडले ) हसले आहे. तुम्हाला हे असे हसायचे असेल तर मात्र तुम्ही ते नक्कीच मिस केले ..

बर्याच जणांना आपण कवी आहोत किंवा कवयित्री आहोत हे कळल्यावर हरखून जायला होते. म्हणजे मी नवीन उदयाला आलेल्यान्बद्दल बोलत आहे. आणि त्यात तर जबरदस्तीचा audience मिळाला प्रत्यक्ष काव्य ऐकायला तर मग सांगायला च नको.  काही वेळा मोठ्या status च्या अशा  संमेलनात मग थोडे असेही काही ऐकून घ्यावे लागते..तोंड दाबून बुक्यांचा मार..

तर गोष्ट अशी आहे कि एक सुदृढ बाई ह्या संमेलनात कवयित्री म्हणून आल्या. आणि स्वतःवरच खुश होऊन त्यांनी आपली कविता वाचायला घेतली..आम्ही तेंव्हा होबार्ट मध्ये होतो..असे म्हणत तिने बरीच मोठी प्रस्तावनेची बारात प्रेक्षकांवर केली. तिथेच माझी हसून हसून आधी मुरकुंडी वळली होती कारण होबार्ट मधून बाहेर येईन ही बया आता मूळ मुद्द्यावर कधी येणार ह्या कल्पनेने मला रडू न आणण्याचे मीच ठरवले होते..

आणि शेवटी चालू झाली तिची धुक्याची मिठी..आणि नुसती चालूच नाही तर तिने त्याला चाल ही लावलेली असल्याने तिने गाणेच म्हणायला सुरु केले मोकळ्या हवेचे..ते ऐकून आम्ही ठार  वेडे होत आलेलो कारण ती चाल पूर्णपणे चोरलेली होती (आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल). आणि तिचे गाणे पण तेवढेच stage वर भयानक वाटत होते ऐकायला..

त्यानंतरचे lyrics पण हळूहळू पुढे आले..धुंद भावनेला धुक्याची मिठी..आणि पुन्हा एकदा तेच पारायण.एकदा तर वाटले की हे सगळे धुके आता अख्या सभागृहात पसरते  की काय...

तर थोडक्यात अत्यंत हसतमुखाने आम्ही हा कार्यक्रम  बघितला आणि अर्थात हसू लपवत लपवत हे सांगायला नकोच...